नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या भिवंडीत गेल्या काही वर्षात काँग्रेसची पीछेहाट झाली असून आगामी लोकसभेत भिवंडीचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्याची रणनीती पक्षाच्या नेत्यांनी आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडी लोकसभा मतदार संघातून काढण्यात येत आहे. या यात्रेचा भिवंडी काँगेसच्या उभारीला ‘हात’ भार लागेल, असे दावे पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत असले तरी लोकसभा निवडणुकीनंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल.

ठाणे जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचे मोठी ताकत होती. कालांतराने पक्षाची ताकद कमी होत गेली आणि पक्षाची अवस्था आता तोळामासा सारखी झाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात शिवसेना आणि त्यानंतर भाजपची ताकद वाढली असून २०१४ मध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा पराभव होऊन भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे विजयी झाले. या मतदार संघातून ते दोनदा विजयी झाले असले तरी २०१७ मध्ये भिवंडी पालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली होती. राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीसाठी येत होते आणि त्यावेळी त्यांनी याठिकाणी चौक सभा घेतल्या होत्या. त्याचा फायदा काँग्रेसला पालिका निवडणुकीत झाला होता. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आगामी लोकसभेत भिवंडीचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्याची रणनीती पक्षाच्या नेत्यांनी आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडी लोकसभा मतदार संघातून काढण्यात येत आहे. या यात्रेचा भिवंडी काँगेसच्या उभारीला ‘हात’ भार लागेल, असे दावे पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात आणखी एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी बंद, प्रवाशांचा मनस्ताप सुरुच…

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दीड लाख मताने काँग्रेसचा पराभव झाला होता. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा पक्ष भाजप सोबत होता. परंतु आता हा पक्ष त्यांच्या सोबत नाही. या पक्षाचे येथे अडीच लाखांच्या आसपास मतदार आहेत. तसेच राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून भिवंडी ही यात्रा जाणार असल्याने त्याचा निश्चितच काँग्रेसला फायदा होईल आणि आगामी निवडणुकीत काँग्रेस हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करेल. -सुरेश टाव्हरे, माजी खासदार, काँग्रेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा आहे यात्रेचा मार्ग

वाडा, कुडूस, अंबाडी, शेलार येथून भिवंडी नदीनाका, वंजारपट्टी, आनंद दिघे चौक, राजीव गांधी चौक, साईबाबा मंदिर, कल्याण फाटा मार्गे सोनाळे येथून ही यात्रा जाईल. या यात्रेदरम्यान आनंद दिघे चौकात राहुल गांधी हे नागरिकांना संबोधित करणार आहेत.