ठाणे : घोडबंदर मार्गावरील ब्रम्हांड आणि वाघबीळ परिसरात दोन पादचारी पूल उभारण्यात येणार असून या कामाचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आल्याने पुढील आठवड्यात भूमिपूजन होऊन पुलांच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळणार आहेत. तसेच कासारवडवली, ओवळा, भायंदरपाडा व गायमुख या भागातही एमएमआरडीएच्या माध्यमातून पादचारी पुलांची उभारणी करण्यात येणार आहे.

घोडबंदर मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. शिवाय, या मार्गावर मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. रस्ता ओलांडताना काही नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. याठिकाणी पादचारी पूल उभारणीची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएकडे केली होती. परंतु, मेट्रो प्रकल्पामुळे त्यास परवानगी मिळत नव्हती. अखेर सरनाईक यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे पूल किती महत्त्वाचे आहेत, हे पटवून दिले. त्यानंतर दोन्ही पूल बांधण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून आणि मेट्रोच्या कामामध्ये कुठेही अडचण होणार नाही अशाप्रकारे आराखडा बदलून ठाणे महापालिकेला पूल उभारणीस मंजूरी दिली होती. यानंतर पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार निश्चित केला. या दोन्ही पुलांचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आला असून, पुढील आठवड्यात आमदार सरनाईक यांच्या हस्ते या पुलांचे भूमिपूजन होणार आहे. या पुलांच्या कामासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

हेही वाचा – कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलचा स्वयंचलित दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांची तारांबळ

हेही वाचा – कल्याणमध्ये विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रम्हांड येथील पादचारी पुलाची लांबी ५२.२९ मीटर, रुंदी ३.७८ मीटर आणि उंची ५.६५ मीटर ठेवण्यात येणार असून वाघबीळ येथील पादचारी पुलाची लांबी ४३.९४ मीटर, रुंदी ३.७८ मीटर आणि उंची ५.६५ मीटर ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही बाजूला चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहेत, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कासारवडवली, ओवळा, भायंदरपाडा व गायमुख या परिसरामध्ये सुद्धा पादचारी पूल उभारणीची मागणी नागरिकांमधून सातत्याने होत आहे. परंतू, सद्यपरिस्थितीमध्ये ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे या पुलांचा खर्च एमएमआरडीए करणार आहे. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने या पुलांचे कामही लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.