गृहकर्ज देताना तक्रारदारांकडून नियमांची पूर्तता करून घेण्यात चालढकल केली तसेच कोणतीही पूर्वकल्पना देण्यापूर्वीच तक्रारदाराचे व्याज वाढविणाऱ्या बँक ऑफ बडोदाच्या अंबरनाथ शाखेच्या व्यवस्थापनाला तब्बल पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

बदलापूर येथे राहणाऱ्या राजेंद्र गांगुर्डे यांनी गृहकर्जासाठी ४ लाख रुपये बँक ऑफ बडोदा येथून घेतले. त्यानंतर कर्ज रकमेचा हप्ता त्यांच्या बचत खात्यातून कापून घेण्याचे अधिकार गांगुर्डे यांनी बँकेला दिले होते. नोव्हेंबर २००६ ते फे ब्रुवारी २००७, एप्रिल-मे २००७ आणि त्यानंतरचे काही हप्ते बँकेने तक्रारदाराच्या बचत खात्यामधून कापले नाहीत. शिवाय ही थकीत रक्कम आणि त्यावरील व्याज, दंडात्मक कारवाई व्याज कर्जाच्या मुद्दल रकमेमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे कर्ज रक्कम वाढत गेली. याबाबत गांगुर्डे यांनी बँकेकडे अनेक वेळा विचारणा केली. मात्र, व्यवस्थापनाकडून कोणतेही ठोस उत्तर आले नाही. तसेच गांगुर्डे यांना थकीत रक्कम भरण्यासाठी सातत्याने नोटीस बजाविण्यात आली.

दरम्यान, गांगुर्डे यांनी यासंबंधी माहिती अधिकाराखाली बँकेकडून माहिती मागवली. त्यामध्ये बचत खात्यामधून कर्ज हप्ता कापून घेण्याची सूचना गांगुर्डे यांनी दिली नसल्याचे समोर आले. मात्र गांगुर्डे यांच्या ही बाब लक्षात आली नाही. त्यामुळे बँकेने ग्राहकाशी संवाद न साधता कारवाई केल्याने गांगुर्डे यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. याप्रकरणी  ग्राहक मंचाचे सदस्य ना. द. कदम यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतरबँक ऑफ बडोदाला नुकसानभरपाई आदेश दिले.