कल्याण – गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेला कल्याण मधील मराठी आणि परप्रांतीयांमधील मराठी, हिंदी भाषक विषयाचा वाद काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. कल्याणमधील पटेल आर मार्टमधील एका ग्राहक सेवेतील परप्रांतीय तरूणीने ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना हिंदी भाषेतून उत्तरे दिली. त्यावेळी तुम्हाला मराठी येत नाही का, असा प्रश्न घाणेकर यांनी करताच, मराठी नाही आली तर काय फरक पडतो. आणि मराठी बोलण्याची काही सक्ती आहे का, असे प्रश्न आदळआपट करत तरूणीने केले.

यावेळी महिनाभरात या दुकानातील प्रत्येक कर्मचारी मराठी बोलला पाहिजे, अन्यथा या दुकानात खरेदी करू नका, असे आवाहन आपण नागरिकांना करणार आहोत, असा इशारा घाणेकर यांनी व्यापारी संकुल दुकान व्यवस्थापनाला दिला आहे.

त्यामुळे कल्याणमध्ये पुन्हा मराठी आणि परप्रांतीय यांच्या बोली भाषेवरून वाद रंगला आहे. सोमवारी सकाळी ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर कल्याण मधील टिळक चौकातील पटेल आर मार्ट दुकानात वस्तू खरेदीसाठी गेले होते.

तेथे वस्तू खरेदी करताना घाणेकर यांनी मंचका समोरील ग्राहक सेवेतील तरूणीला खरेदीच्या वस्तू देण्याची मागणी केली. तरूणीने हिंदीतून बोलणे सुरू केले. घाणेकर यांनी तुम्हाला मराठी येत नाही का, असा प्रश्न केला. तरूणीने घाणेकर कोण याचा परिचय नसल्याने त्यांना मराठी बोलण्याची सक्ती आहे का. नाही आली तर काय फरक पडतो, अशी उलट उत्तरे दिली. ही उत्तरे तरूणीने रागाच्या भरात हात आदळआपट करत दिली.

घाणेकर यांनी तातडीने पटेल आर मार्ट दुकानाच्या व्यवस्थापनाला ही माहिती दिली. आपण महाराष्ट्रात कधी आहात, असा प्रश्न घाणेकर यांनी विक्रेत्या तरूणीला केला. तिने आपण चार वर्ष महाराष्ट्रात राहत आहोत, असे उत्तर दिले. दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना घाणेकर यांनी घडला प्रकार सांगितला. व्यवस्थापक धस यांनी दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कामगारांना तशा सूचना केल्या जातील, असे आश्वासन घाणेकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

पटेल आर मार्टमधील कामगारांना १५ ऑक्टोबरपर्यंत मराठी बोलता आली पाहिजे यादृष्टीने आपली नजर राहील. आपण स्वता याविषयीची खात्री करू. अन्यथा, १५ ऑक्टोबरपासून आपण दररोज पटेल आर मार्ट दुकानाच्या प्रवेशव्दारावर उभे राहून या दुकानातील कामगारांना मराठी भाषा येत नाही. त्यामुळे या दुकानात खरेदी करू नका, असे आवाहन ग्राहकांना करणार आहोत, असा इशारा घाणेकर यांनी व्यापारी संकुल व्यवस्थापनाला दिला आहे. शासकीय सेवेतील एका परप्रांतीयाने महिलेला आणि शेजाऱ्यांंना धूप लावण्याच्या विषयावरून मारहाण केली होती. हे प्रकरण खूप गाजले होते. कल्याण पूर्वेत एका अमराठी भाषक दुकानदाराने दुकानातील अल्पवयीन मराठी तरूणीला अश्लिल मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला असल्याचे प्रकार चर्चेत आहे.