करोना संसर्गामुळे शाळा बंद असल्यातरी मुलांना लसमात्रा
कल्याण : करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळा जानेवारीअखेरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण ठरलेल्या नियोजनानुसारच केले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुलांच्या लसीकरण करण्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही. कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर महिनाभरात मुलांना दुसऱ्या मात्रेचा लाभ घ्यायचा आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुलांचे एका वेळी पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले की दुसरी मात्रा देताना तशाच पद्धतीने नियोजन करणे शक्य होणार नाही. शाळा बंद असल्या तरी मुलांचे लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. संबंधित शाळा, आरोग्य केंद्र, पालक आणि शिक्षकांच्या समन्वयातून हे लसीकरण केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले, १८ वयोगटापासून पुढे ज्या वेळी मुलांचे लसीकरण सुरू झाले. या शाळेतील १२५ विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यांचे लसीकरण सुरू आहे. ७५ मुलांनी लस घेतली आहे.
डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आशीर्वाद बोंद्रे यांनी सांगितले, पालिकेच्या आदेशाप्रमाणे टिळकनगर शाळेतील एकूण ९०० विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये ३०० मुले इयत्ता दहावी आणि काही नववीतील आहेत. उर्वरित ६०० विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत.लसीकरणासाठी पालकांचे हमीपत्र शाळेने भरून घेतले आहे. लसीकरणासाठी शाळेत पालक, विद्यार्थी यांची गर्दी होणार नाही हा विचार करून दर एक तासाने विद्यार्थी लसीकरणासाठी येतील. बुधवार, गुरुवार ३०० मुलांचे लसीकरण पूर्ण झाले की मग पालिका आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांच्या नियोजनाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांचे लसीकरण करून घेऊ, लसीकरणासाठी येताना मुलांनी मोबाइल आणावेत. नसतील तर पालकांना सोबत आणावे. जेणेकरुन मुलांचे वेळीच लसीकरण व्हावे हा उद्देश आहे, असे बोंद्रे यांनी सांगितले. शहरापासून दूर असलेल्या इतर शाळांनी टिळकनगर शाळेत मुलांचे लसीकरण करून देण्याची मागणी केली तर त्याचाही नक्की विचार संस्था करेल. फक्त या लसीकरणासाठी पालिका, शासकीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली पाहिजे, असे विश्वस्त बोंद्रे यांनी सांगितले.
अपुरा कर्मचारी वर्ग
टिटवाळा रेल्वे स्थानकात सकाळीच लसीकरणासाठी गर्दी होती. टिटवाळा परिसरातील रहिवासी आणि कामावर निघालेले प्रवासी एकाच रांगेत होते. कामाला जायचे आहे, असे सांगून काही प्रवासी मध्येच शिरून लस घेत होते. त्यामुळे रांगेतील प्रवासी आणि रहिवासी यांच्यात वाद सुरू होते. लसीकरणातील बहुतांशी कर्मचारी शाळांमध्ये लसीकरणासाठी गेल्याने रेल्वे स्थानकातील केंद्रावर अपुरे कर्मचारी उपलब्ध होत आहेत.
लसीकरण केंद्रांवर गर्दी
करोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन आतापर्यंत लसीकरण करण्यास टाळाटाळ करणारे नागरिक लस घेण्यासाठी सरसावले आहेत. पालिकेच्या १६ लसीकरण केंद्रांवरील गर्दी पुन्हा वाढली आहे. मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या सहा लसीकरण केंद्रांवर पालक, विद्यार्थी स्वत:हून येत आहेत. रेल्वे स्थानकांवर लसीकरणाची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.