|| किशोर कोकणे/ सागर नरेकर/ अमर सदाशिव शैला

नव्या टाळेबंदीतून लघुउद्योग, कारखान्यांना सूट; मात्र, बाजारपेठ बंद

ठाणे/अंबरनाथ/मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या निर्बंधांमधून कारखाने तसेच लघुउद्योगांना वगळण्यात आले आहे. मात्र, जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ बाजारपेठा बंद असताना तसेच विविध प्रकारच्या कच्च्या मालाचा पुरवठा रोखला गेला असताना उत्पादन सुरू राहिल्याचा फायदा काय, असा प्रश्न हे उद्योजक करत आहेत. एवढेच नव्हे तर, नव्या नियमावलीनुसार, अशा उद्योगांतील कर्मचाऱ्यांची नियमित चाचणी आणि लसीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी कशी करायची, हाही त्यांच्यासमोरील पेच आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात हजारो लघुउद्योग कारखाने आहेत. घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून या कारखान्यांना मालाची मागणी पाठविली जाते. या लघुउद्योगांमध्ये उत्पादित झालेला माल मुंबईसह राज्यातील दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. सध्या ही दुकानेच बंद असल्याने कारखान्यांनाही उत्पादन बंद करावे लागणार आहे.

‘क्लोथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे राहुल मेहता यांनी हीच बाब अधोरेखित केली. ‘तयार कपड्यांचा व्यवसाय दिवाळीनंतर पूर्वपदावर येऊ लागला होता. उन्हाळ्यात मागणी वाढण्याची अपेक्षा होती. मात्र सध्या एक महिना दुकाने बंद राहिली तर कपडे निर्मिती उद्योग बंद होईल. माल विकण्यासाठी बाजारपेठ नसल्याने आता कारखान्यातील उत्पादन थांबवावे लागणार आहे. यातून कारखाने बंद करावे लागतील. पुन्हा एकदा अनेक कामगारांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर आहेत,’ असे ते म्हणाले.

चाचणी, लसीकरणाच्या अटींची बाधा

राज्य सरकारने लघुउद्योगांना सवलत देताना काही अटीही घातल्या आहेत. त्यामध्ये कारखान्यांतील कामगारांच्या १० एप्रिलपर्यंत करोना चाचण्या करून अहवाल प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामगारांचे लसीकरण तातडीने करून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मात्र, या दोन्ही अटींची पूर्तता करणे कठीण असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. ठाणे जिल्ह्यातील ३० हजार कारखान्यांमध्ये पाच लाख कामगार कार्यरत आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या पाच लाख कामगारांची करोना चाचणी आणि लसीकरण करणे स्थानिक पातळीवर प्रशासनाला कसे शक्य होईल, असा प्रशद्ब्रा उद्योजकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या सुचनेनुसार ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये सुमारे ६० टक्क्यांहून अधिक कामगार हे २५ ते ४० वयोगटातील आहेत. त्यामुळे त्यांचे लसीकरण कसे करायचे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. ‘करोना चाचणीचे अहवाल वेळेवर मिळत नाहीत. लसीकरणासाठी पुरेशी केंद्रेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे नियम आमच्यावर लादता कामा नये,’ असे ठाणे लघुउद्योग संघटनेचे (टीसा) मानद महासचिव सुनील कुलकर्णी यांनी सांगितले. राज्य सरकारने उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी स्थानिक पातळीवर अनेक त्रास सहन करावा लागत आहे, असे चेंबर्स ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनचे (कोसिया) उपाध्यक्ष संदीप पारेख यांनी सांगितले.

कामगारांचीही वानवा

परराज्यातून किंवा परगावाहून मुंबईत आलेल्या अनेक कामगारांनी गेल्यावर्षीच्या टाळेबंदीची धास्ती बाळगून परत जाण्याचा पर्याय पत्करला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेल्या टाळेबंदीच्या चर्चेमुळे प्रत्यक्षात निर्बंध कठोर होण्यापूर्वीच कामगार परतू लागले. त्यामुळे अनेक छोटे-मध्यम उद्योग, दुकाने यांना कामगार मिळनासे झाले आहेत.  मुनीराम यादव यांचा खैरानी रस्ता परिसरात ‘प्लास्टिक मोल्डिंग’चा व्यवसाय आहे. ‘पुढील १० ते १५ दिवस पुरेल एवढे काम आहे. मात्र टाळेबंदीच्या भीतीने एक कामगार गावाला निघून गेला आहे. तर उर्वरित तीन कामगार गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांना कसेबसे थांबवले आहे. सध्या थोडेफार काम मिळत आहे. मात्र कामगार गावी निघून गेल्यास मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या काम मिळत असूनही ते घेण्यास नकार द्यावा लागत आहे,’ असे यादव यांनी सांगितले.

कच्च्या मालाचे काय?

एकीकडे बाजारपेठ बंद असल्याने उत्पादनाच्या विक्रीचा पेच आहे तर, दुसरीकडे उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा प्रश्न आहे. ‘बाजारपेठा बंद असल्याने कच्चा माल मिळत नाही. त्यातून एक यंत्र बंद ठेवावे लागले आहे. सध्या कामगारांना दिवसाआड कामाला बोलाविले आहे. मात्र निर्बंध कायम राहिल्यास उत्पादन बंद करावे लागेल,’ असे इमिटेशन ज्वेलरीचे उत्पादक राजेंद्र जैन यांनी सांगितले. ‘गेल्या वर्षीच्या तुलनेच व्यवसाय पूर्ववत झाला नसला तरी दिवाळीनंतर चामडी बॅगना काही प्रमाणात मागणी होती. मात्र सध्या बाजारपेठा बंद केल्यामुळे कच्चा माल आणि आवश्यक साहित्य मिळत नाही. त्यातच विक्रेत्यांची दुकानेही बंद झाली आहेत. त्यामुळे उत्पादनाला मागणीही नाही. पुढील दोन-तीन दिवसात परिस्थिती बदलली तर ठीक, अन्यथा कामगारांसह गावी निघून जावे लागेल, असे धारावीतील बॅग निर्मिती कारखान्याचे मालक मोहम्मद गुड्डू शेख यांनी सांगितले.

‘आमचा प्राणवायू हिरावू नका’

सरकारने प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करणाऱ्यांना ८० टक्के पुरवठा हा आरोग्यसेवेसाठी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, इतर उद्योगांनाही प्राणवायूची गरज असते. जर प्राणवायूच्या पुरवठ्यावर चालणाऱ्या उद्योगांना २० टक्केच पुरवठा होणार असेल तर उद्योग कसे चालवावे असे टीसाचे सहसचिव ए. वाय. अकोलावाला यांनी सांगितले. तर, उद्योगधंद्यांना कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कंपन्या सरकारने सुरू ठेवणे गरजेचे आहे. कच्चा माल मिळाला नाही तर, उद्योग सुरू कसे राहतील, असे टिसाच्या उपाध्यक्ष सुजाता सोपारकर यांनी सांगितले.

अंबरनाथसारख्या शहरात ४० हजार कामगार आहेत. त्यांचे लसीकरण किंवा साधी करोना चाचणी करायची झाली तर, किमान काही महिने लागतील. शहरांच्या आरोग्य क्षमतेला गृहीत धरून किमान निर्बंध आणि नियम जाहीर करण्याची गरज होती. टाळेबंदीच्या संभ्रमामुळे कामगारांची संख्या घटत आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने लवकरच कंपन्या बंद कराव्या लागतील.

उमेश तायडे, अध्यक्ष, अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन (आमा.)