राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्याने आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. आनंद परांजपे एका नेत्याच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान मंगळवारी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनीही करोनावर मात केली. करोनामुक्त झाल्यानंतर मधुकर कड ठाण्यात आले होते. आनंदनगर टोलनाक्यावर परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. वाहनातून उतरल्यानंतर कड यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. सहकाऱ्यांचं हे प्रेम पाहून मधुक कड यांना अश्रू अनावर झाले होते.

करोना अटोक्यात रहावा यासाठी रात्र-दिवस झटणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे देवदूत आहेत. त्यांना साथ द्या, असे भावनिक आवाहन मधुकर कड यांनी यावेळी केले.

ठाणे महापालिका क्षेत्रामधील हवा प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करूनही प्रशासनाच्या पदरी निराशा पडत असतानाच, टाळेबंदीमुळे वातावरणात मोठे बदल होऊन अनेक वर्षांनंतर शहरातील प्रदूषण निम्म्याने घटले आहे. यापूर्वी १०० टक्कय़ांपेक्षा जास्त असलेला शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक आता निम्म्याने कमी म्हणजे ५० टक्क्यांच्या आसपास आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रदूषणात प्रथमच इतकी मोठी घट झाली आहे.

देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown ncp leader anand paranjape with wife returns home from hospital sgy
First published on: 29-04-2020 at 10:55 IST