जिल्हाधिकारी, पोलीस, आयोजकांची आज बैठक

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येत असून त्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. मात्र, करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत असून यामुळेच यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रांवर करोनाचे सावट असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज, शुक्रवारी स्वागत यात्रा आयोजक आणि पोलिसांची तातडीची बैठक बोलवली असून त्यामध्ये यात्रा काढायची की नाही, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्य़ात विविध ठिकाणी स्वागत यात्रा काढल्या जातात. त्यापैकी ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठय़ा स्वागत यात्रा निघतात. त्यामध्ये शहरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वच जण मोठय़ा संख्येने सहभागी होतात. या यात्रांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक संदेश देण्यात येतो. ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागतयात्रा काढण्यात येत असून यंदा या यात्रेच्या माध्यमातून ‘ज्ञानमयो विज्ञानमयोसी’ अशी वैज्ञानिकविषयक संकल्पना राबवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तसेच या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या संकल्पनेस शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदा यात्रेत सहभागी होण्यासाठी ४५ संस्थांनी आयोजकांकडे नावे नोंदविली आहेत. गेल्यावर्षी ३० संस्थाच सहभागी झाल्या होत्या. मात्र, यंदा नव्या १५ संस्था सहभागी होणार असल्याने स्वागत यात्रा भव्य स्वरूपात निघणार असल्याचे बोलले जात होते. असे असतानाच जगभर फोफावत असलेल्या करोना विषाणूची लागण झालेले रुग्ण राज्यात आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नसल्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसून यंदाची स्वागत यात्रा दरवर्षीप्रमाणेच उत्साहात साजरी करण्याचे नियोजन आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले  आहे.

जगभरात ‘करोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र स्वागत यात्रेसंबंधित शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे यंदाही स्वागत यात्रा उत्साहात होणार आहे.

-अश्विनी बापट, कार्यवाह, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत यात्रा आयोजक आणि पोलिसांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये आयोजकांना करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले जाणार आहे.     

-राजेश नार्वेकर,    ठाणे जिल्हाधिकारी