कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निलंबन आढावा समितीने घेतलेल्या निर्णयानंतर मागील तीन ते चार वर्षांत लाच घेताना पकडलेले संशयित लाचखोर कर्मचारी महापालिका सेवेत पुन्हा हजर करून घेण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केलेले गणेश बोराडे यांचाही यामध्ये समावेश आहे. बोराडे यांना सेवेत घेण्यासाठी महासभेची मंजुरी आवश्यक मानली जात होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना कामावर हजर करून घेण्यात आले आहे.
बोराडे हे बाजार विभागातील कर्मचारी आहेत. बोराडे यांच्याशिवाय लाच घेताना पकडलेल्या प्रभाग अधिकारी स्वाती गरुड यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेण्यात आले आहे. गणेश बोराडे हे २०१४ मध्ये ‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी होते. विमल शंकशेळा नावाचा दुकानदार आपल्या दुकानाची दुरुस्ती करत असतात ही दुरुस्ती बेकायदा आहे, असे सांगत बोराडे यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. या रकमेतील तीन लाखांचा हप्ता स्वीकारताना त्यांना अटक केली होती.
डोंबिवलीत ह प्रभागात प्रभाग अधिकारी असताना दोन नगरसेवकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यासाठी बोराडे यांनी साडेसहा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या मागणीतील दीड लाख रुपयांचा हप्ता घेताना बोराडे यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे दोन वर्षे ते निलंबित होते. बोराडे यांना निवृत्तीसाठी दोन वर्षे शिल्लक असताना त्यांना पुन्हा कामावर हजर करून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
निलंबन आढावा समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, शासन आदेश, १२ संदर्भ पत्रांचा विचार करून ही कार्यवाही करण्यात आली आहे. – अरुण वानखेडे, साहाय्यक आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग