ठाणे : ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागातील चांगल्या रस्त्यांवर नवीन डांबर टाकायचे आणि करोडो रुपयांची बिले काढायात येत असून यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर माझ्यासोबत चला मी तुम्हांला दाखवतो, कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यावर डांबर टाकले आहे, असे खुले आव्हान दिले. भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महापालिका झाल्याचा गंभीर आरोप करत आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा येथे ठाणे महापालिकेमार्फत रस्त्याची कामे चालू आहेत. त्यासाठी खास निधी आणला आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढले आहे. सगळ्या भागातील रस्ते चांगले आहेत, फक्त त्याच्यावर नवीन डांबर टाकायचे आणि करोडो रुपयाची बिले काढायची. यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसेच किती फसवणार आहेत ठाणेकरांना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मी स्वतः हे लिहीत आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर माझ्यासोबत चला मी तुम्हांला दाखवतो, कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यावर डांबर टाकले आहे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे.
हेही वाचा… आयुक्तांचे आदेश डावलून क, फ प्रभागातील सफाई कामगार फेरीवाला हटाव पथकात ठाण मांडून
हेही वाचा… डोंबिवली-कल्याणमधील नाले गाळ, कचऱ्याने भरलेले; प्रशासन अद्याप ठेकेदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
सर्वात महत्वाचे म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधींच्या स्थायी समितीला जास्तीत जास्त एक टक्का ते दिड टक्का घ्यायचे. आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेट वाढवलेला आहे. आणि तोही किती तर ५ टक्के. आणि जोपर्यंत ५ टक्के अधिकाऱ्याच्या हातात देत नाहीत, तोपर्यंत फाईलवर सहीच होत नाही. बाहेर आल्यावर स्वतःला अतिशय पापभिरू अधिकारी म्हणून मिरवणारे केबिनमध्ये बसल्यावर रावणाचा अवतार धारण करतात आणि भस्मासूरासारखे वागतात, असा गंभीर आरोप करत अधिकाऱ्यांची नावेही जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयुक्त साहेब तुम्ही तर विचार करा गरीब ठेकेदाराला ५ टक्के एकत्र द्यायला जमतात का? सगळीकडे काम बंद स्थितीत आहेत. लोक फाईल घ्यायला तयार नाहीत. एक टक्क्यावरच समाधान मानायला हव होत. आपली तर भूक इतकी मोठी आहे की आपले सगळे अधिकारी ५ टक्के मागायला लागले आहेत. आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.