भगवान मंडलिक
जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई महापालिकांमधील लोकप्रतिनिधींच्या मुदती केव्हाच संपुष्टात आल्या आहेत, तर ठाणे, उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवकांची मुदतही येत्या दोन महिन्यांत संपत आहे. अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकाही निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहेत. करोनाचा विळखा पुन्हा बसत असला तरी येथील राजकीय नेते मात्र निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. आणि त्यातूनच या पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे राजकारण निवडणूककाळात गटातटाचे, अघोरी स्पर्धेचे असले तरी या राजकारणाने काही मोजके अपवाद वगळले तर फारसे उग्र, तप्त रूप धारण केल्याचे पाहायला मिळालेले नाही. ही परंपरा अगदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे, भाजपचे नेते प्रा. राम कापसे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राजाराम साळवी, असल्यापासुनची आहे. याच परंपरेच्या वाटय़ावरून ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयमित प्रवास सुरू आहे. शिंदे, वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण या नेत्यांनी निवडणुकांच्या आखाडय़ात टोकाचे राजकारण केले, मात्र त्यास वैयक्तिक शत्रुत्वाची किनार कधी आल्याचे दिसले नाही. गेल्या काही काळात मात्र राजकीय चढाओढ टोकाला पोहोचते की काय असे एकंदर चित्र आहे. डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला. संघ हा येथील मूळ मतदार. तरीही येथील भाजप आमदाराला सावरून घेत एकनाथ शिंदे यांनी पडद्याआडून का होईना हातमिळवणीचे राजकारण करण्यावर भर दिला. कल्याण डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथील महापालिका निवडणुका नेहमी एकटय़ाने पक्षपातळीवर लढविल्या. निवडणूककाळात कितीही स्पर्धा असली तरी पडद्यामागून भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांचे नेते बालेकिल्ल्यातील त्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल आणि त्याच्या समोर कच्चा की पक्का उमेदवार ठेवायचा हे ठरवले जात होते. काळोखात ठरविलेल्या या गोष्टी सकाळच्या सूर्यप्रकाशात उघड होत होत्या. पण त्याचा कधी कोणी बाऊ केला नाही. त्यावरून वाद घातला नाही. गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलू लागले आहे. विशेषत: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच शिवसेनेतील नवी पिढी कमालीचे आक्रमक राजकारण करू लागल्याचे दिसू लागले आहे. पिता एकनाथ शिंदे यांचे संयमित, बुजरे, खांद्यावर हात टाकून सांभाळून घेण्याचे राजकारण कदाचित चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मान्य नसावे. त्यामुळेच ते आरपारची लढाई खेळत प्रस्थापितांना धक्के देत विकासकामे मार्गी लावून वेगाने मार्गक्रमण करताना दिसत आहेत आणि त्यातून डोंबिवलीत शिंदे मित्र अशी ओळख असलेले रवींद्र चव्हाण आणि ठाण्यात जितेंद्र आव्हाडांशी शिवसेनेतील तरुणाई टोकाची लढाई लढण्याच्या मन:स्थितीत दिसू लागली आहे.
उल्हासनगरमधील कलानी गटातील फोडाफोडी. तेथील सत्ता काबीज करणे हे त्याचे उत्तम उदाहरण. कल्याण, डोंबिवली, ग्रामीण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरात आपल्या विकासकामांमुळे कोणी दुखावले याची पर्वा खासदार शिंदे करत नाहीत. नगरविकासमंत्र्यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी कोटय़वधी रुपये मंजुर करून आणायचे, धडाक्यात या कामांचे शुभारंभ करायचे, हे करत असताना त्या त्या भागातील विरोधकांना अंगावर घ्यायचे असे आक्रमक राजकारण खासदार शिंदे यांनी सुरू केले आहे. विकासकामांच्या आडून सुरू असलेले हे राजकारण इतके टोकाला पोहोचले आहे की, मध्यंतरी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना खासदार शिंदे यांच्यासमोरच माझ्याही कामांसाठी वडिलांना सांगून पैसे मिळवून द्या असा आर्जववजा टोला हाणावा लागला होता. आव्हाडांसारख्या राज्यातील मंत्र्याची ही अवस्था तर विरोधी बाकांवर बसलेल्या रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांचे काय होत असेल हे कुणी सांगायला नकोच. पिता शिंदे विकासदानाच्या सिंहासनावर असल्याने त्या माध्यमातून निधी आणून कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते, पूल, रखडलेली जुनी विकासकामे मार्गी लावण्याचा सपाटा खासदार शिंदे यांनी लावला आहे. ही कामे करत असताना मिशन कळवा, डोंबिवली शिवसेनेचीच, इन्फ्रा मॅन अशी विशेषणे लावत विरोधकांच्या गोटातील अस्वस्थताही खासदार पुत्र वाढवू लागले आहेत. वडिलांचा संयमितपणा आणि मुलगा खा. डॉ. शिंदे यांची विकासातील आक्रमकता आता प्रकर्षांने जाणवू लागली आहे. विकासकामे केल्यानंतर ती दाखविणे, प्रदर्शित करण्यासाठी वेगळय़ा अत्याधुनिक तत्पर यंत्रणा खासदार शिंदे यांनी पदरी ठेवल्या आहेत. सध्या एवढय़ा प्रभावी यंत्रणा आणि कामाचा झपाटा कोणा लोकप्रतिनिधीच्या ठिकाणी दिसत नसल्याने साहजिकच हे आक्रमक राजकारण अनेकांच्या नजरेत येऊ लागले आहेत. या आक्रमकतेमधून खासदारांची विकासकामे विरुध्द स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडू लागले आहेत. विकासकामांसाठी निधी आणण्यासाठी यापुढे मंत्रालयात जाण्याची गरज नाही. खासदारांना सांगा निधी पटकन मिळेल, असे बोलून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदारांना पहिला चिमटा घेतला होता. त्यानंतर आघाडी सरकारमध्ये असुनही राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे यांनी कमिशन टीएमएसी मिशन मोहीम राबविण्याची घोषणा करून ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. कानपिळी झाल्याने ही मोहीम मागे घेण्यात आली. असाच प्रकार कल्याण ग्रामीण भागात माजी सेना आमदार सुभाष भोईर, विद्यमान मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्या भागांमध्ये सुरू आहे. आम्ही मागणी केलेली आणि पत्रव्यवहार, पाठपुरावा करून आणलेल्या कामांचे श्रेय खासदार घेत आहेत, अशी रस्सीखेच ग्रामीणमध्ये पाहाण्यास मिळते. डोंबिवलीत तर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बडय़ा सेना, भाजप नेत्यांसमोर विकासकामे करताना शासनाने रखडवलेला ४७१ कोटींचा निधी मोकळा करावा म्हणून विषय उपस्थित करून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले होते. खरे तर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. चव्हाणांनी असे जाहीरपणे शिंदे यांना डिवचल्याची उदाहरणे फारच मोजकी म्हणावी लागतील. मात्र खासदार पुत्राच्या आक्रमक राजकारणापुढे जुन्या मैत्रीचे हे बंध आता तुटू लागले आहेत. पालकमंत्री शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील संयमित राजकारण हळुहळू मागे पडून खासदार शिंदे यांनी या राजकारणाला विकासकामांच्या माध्यमातून आक्रमकतेचा मुलामा देण्यास सुरुवात केली आहे. ही आक्रमकता येत्या काळात ठाणे जिल्ह्यातील राजकारणाचे पदर, विविध कंगोरे आणि आगामी निवडणुकांमधील रंग काय असतील ते दाखवून देत आहेत हे मात्र नक्की.