डोंबिवली – डोंबिवलीतील जोंधळे विद्या समुहातील समर्थ समाज शिक्षण संस्थेच्या सहसचिवाच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर त्यांच्या हस्ताक्षरातील बनावट स्वाक्षऱ्या मारून, ही कागदपत्रे धर्मादाय उपायुक्त कार्यालय, ठाणे आणि मुंबईत वरळी येथे दाखल करणाऱ्या अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील मनोली गावातील एका नागरिका विरुध्द समर्थ समाज संस्थेच्या सहसचिवाच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहातील समर्थ समाज शिक्षण संस्थेचे सहसचिव तात्याबा मुरलीधर शेपाळ (७७) यांनी ही तक्रार केली आहे. विष्णुनगर पोलिसांनी या तक्रारीवरून अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील मनोली गावचे रहिवासी दादा काशिनाथ शेपाळ यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या मार्च महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला आहे. हा बनावट कागदपत्रांचा उघड होताच समर्थ समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सागर जोंधळे आणि व्यवस्थापन मंडळाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णुनगर पोलीस ठाण्यात सहसचिव तात्याबा शेपाळ यांनी दाखल केलेली तक्रार आणि त्यांनी दिलेली माहिती अशी, की गुन्हा दाखल दादा शेपाळ हे आपले नातेवाईक आहेत. ते संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील रहिवासी आहेत. आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता, आपणास अंधारात ठेऊन दादा शेपाळ यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी समर्थ समाज संस्थेचा सदस्य असल्याचे भासवून ठाणे आणि मुंबईत वरळी येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात त्यांनी याचिका दाखल केली.
ही याचिका दाखल करताना दादा शेपाळय यांनी आपल्या हस्ताक्षरातील काही बनावट कागदपत्रे आणि बनावट स्वाक्षऱ्या केल्या. याचिकेसोबत समर्थ समाज संस्थेच्या सदस्यत्वाची ५१ हजार रूपयांची बनावट पावती जोडली होती. अशाप्रकारे तक्रारदार तात्याबा शेपाळ यांची बनावट स्वाक्षरी आणि त्यांच्या हस्ताक्षरातील कागदपत्रे स्वताच्या फायद्यासाठी तयार करून संस्थेच्या प्रणालीमध्ये फेरफार केला म्हणून तात्याबा शेपाळ यांनी संस्था अध्यक्ष सागर जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात तक्रार केली.
मागील मार्चमध्ये हा प्रकार उघडकीला आला होता. पोलिसांनी तात्याबा शेपाळ यांच्या घरी जाऊन बनावट कागदपत्रांची खात्री केली. ही खात्री पटल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे याप्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.