मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचे कारण; प्रेमी जोडप्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांची मुंबईत येऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमी जोडप्यांना मारण्याचाही मुलीच्या वडिलांचा प्रयत्न होता. मात्र ते हाती न लागल्याने थोडक्यात बचावले आहेत. वालीव पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.

अंजू आणि मनोज (नावे बदललेली) यांचे प्रेमसंबंध होते. परंतु अंजूच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यामुळे मनोजने अंजूला बिहार येथून पळवून आणले होते. मनोजने मुलीला पळवून नेल्याने अंजूचे कुटुंबीय संतप्त झाले होते. त्यांनी या दोघांच्या शोधासाठी मुंबई गाठली, मात्र हे दोघे सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी मनोजचे वडील महेंद्र यादव यांच्याकडे विचारणा केली. परंतु त्यांनी या दोघांना कुठे लपवून ठेवले आहे ते सांगण्यास नकार दिला. त्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी महेंद्र यादव (४५) यांचे अपहरण करून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नेले. तेथे यादव यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.

त्यांची ओळख पटू नये यासाठी दगडाने चेहरा ठेचण्यात आला. यादव यांचा मृतदेह गोणीत टाकून तो वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वासमाऱ्या पुलाच्या खाली टाकून दिला होता.

ऑनर किलिंगचा बेत

२६ एप्रिल रोजी हा मृतदेह पोलिसांना सापडला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. अखेर पोलिसांनी तपास करून या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींचा ऑनर किलिंगचा बेत होता. मात्र प्रेमी जोडपे न सापडल्याने त्यांनी मुलाच्या पित्याची हत्या केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस निरीक्षक बांदेकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.