कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारांना पोसण्याचे काम राज्यात करीत आहेत. यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांच्या कृतीमुळे आपण गुन्हेगाराला धडा शिकवण्याकरिता स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. आपली गुन्हेगारी मनोवृत्ती तयार करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केला.

हेही वाचा >>> गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?

गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी संधान बांधले. ते आता भाजपशी काही दिवसांत अशीच गद्दारी करतील. मिळेल तेवढे खाऊन घेतात आणि पुन्हा विरुद्ध काम करतात, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वृत्ती आहे. एकनाथ शिंदेंकडून आपणास कोटयवधी रुपयांचे येणे बाकी आहे. हे त्यांनी एकदा जाहीर करून सांगावे. राज्य गुन्हेगारांपासून वाचवायचे असेल, महाराष्ट्राचे चांगले करायचे असेल तर पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे. गोळीबारामुळे माझी प्रतिमा लोकांसमोर गुन्हेगार म्हणून जाण्यास मुख्यमंत्री शिंदेच जबाबदार आहेत. माझ्यासमोर माझ्या मुलाला मारले जात असेल तर बाप म्हणून ते नुसते पाहून जगण्यात अर्थ काय आहे. मी जो गोळीबार केला त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. मी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आहे, असे गायकवाड म्हणाले.

सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार, हल्ला करतो ही बाब निषेधार्ह आहे. या प्रकरणात कायदा त्याचे काम करील. बिनबुडाचे आरोप कोणी काहीही करू शकतो, त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.