कल्याण – भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना उल्हासनगर न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी (३ फेब्रुवारी) दिले. त्यांची रवानगी त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कळवा येथील पोलीस कोठडीत करण्यात आली. आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा मुक्काम ११ दिवस पोलीस कोठडीत असणार आहे.
सुरक्षेच्या कारणावरून आमदार गायकवाड यांना न्यायालयात द्रृकश्राव्य माध्यमातून सादर करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती. परंतु, हे प्रकरण गंभीर गुन्ह्याचे असल्याने न्यायालयाच्या सूचनेवरून पोलिसांनी त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले. यावेळी पोलिसांकडून हे प्रकरण गंभीर गुन्हा आणि गोळीबाराचे असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह इतर दोन साथीदारांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा >> “शिंदेंनी माझे पैसे खाल्ले, हे गणपत गायकवाडांचे शब्द…”, उल्हासनगरमधील गोळीबाराच्या घटनेवरून काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांना टोला
जमिनीच्या वादातून पोलीस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना कळवा ठाण्यात ठेवण्यात आले होते. न्यायालय परिसरात गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणपत गायकवाड यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडणार होती. त्यानुसार त्यांना ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते. या परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांना ११ दिवसांची कोठडी सुनावली आहे.