प्रत्यक्ष आयोजनाऐवजी ऑनलाइन कार्यक्रम घेण्यास प्राधान्य

ठाणे : ठाणे शहरातील निर्बंध सोमवारपासून शिथील झाले असून सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी शहरातील सांस्कृतिक कट्टे आणि संस्थाचालकांमध्ये प्रत्यक्षरित्या कार्यक्रम सुरू करण्यास संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुन्हा रुग्ण वाढले तर प्रत्यक्षरित्या होत असलेल्या कार्यक्रमांवर बंदी येईल. त्याचबरोबर ५० टक्के क्षमतेने कार्यक्रम घेणे परवडत नसल्याने सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन सुरू ठेवण्यावर आयोजक प्राधान्य देत आहेत. ज्यावेळी करोना परिस्थिती पूर्णपणे अटोक्यात येईल आणि सरकारकडून १०० टक्के क्षमतेने कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळेल, तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या सुरू करण्यात येतील, असे अनेक संस्थापकांकडून सांगण्यात आले.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या आणि मृत्यूचे प्रमाण घटले असल्याने या शहरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. हॉटेल, मॉल, केशकर्तन, व्यायामशाळांसह सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांमध्ये

सरकारच्या या नियमांबद्दल संभ्रम असल्याचे चित्र आहे. करोनामुळे गेले एक ते दीड वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम हे ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित असणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. तसेच करोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही. अनेक तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असताना कार्यक्रमाचे प्रात्यक्षिकरित्या आयोजन करणे योग्य वाटत नाही, असे अनेक  संस्थाचालकांकडून सांगण्यात आले. ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यामार्फत दर रविवारी ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, आता ५० टक्के क्षमतेने प्रात्यक्षिकरित्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली असली तरी, एक महिना करोना परिस्थिती पाहून नंतर प्रात्याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असे या कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी सांगितले. तर ५० टक्के क्षमतेने प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करणे परवडणारे नाही. त्यामुळे जेव्हा १०० टक्के क्षमतेने कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळेल, तेव्हाच भटकंती कट्ट्याचे कार्यक्रम पुन्हा सुरू होतील, असे दिवाकर साटम यांनी सांगितले.

प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्याचा पेच

शहरातील विविध कट्टाचालकांकाडून तसेच संस्थाचालकांकडून गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. त्यामुळे या ऑनलाइन कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने प्रेक्षकवर्ग उपस्थित राहत होता. मात्र करोना निर्बंध शिथिलतेनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे ५० टक्के उपस्थितीत करण्यास परवानगी दिली आहे. या बंधनामुळे प्रात्यक्षिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमात प्रेक्षकसंख्येवर मर्यादा येणार असल्याने हा प्रेक्षवर्ग टिकवून ठेवण्याचा पेच अनेक संस्थांपुढे आहे. ठाण्यातील ‘आधार रेखा प्रतिष्ठान’ संस्था कर्करोग रुग्णांसाठी काम करत आहे. यासंदर्भात ही संस्था विविध व्याख्यानाचे आयोजन करत असते. या संस्थेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. परंतु प्रात्यक्षिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमात त्यावर मर्यादा येत असल्याने हा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी संस्थेने प्रात्यक्षिकसह ऑनलाइन कार्यक्रमही सुरू ठेवण्याचे ठरविले आहे. तसेच प्रात्यक्षिकरित्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी नावनोंदणी पद्धत सुरू करण्यात येणार असल्याचे ‘आधार रेखा प्रतिष्ठान’च्या संस्थापिका रश्मी जोशी यांनी सांगितले.

करोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नाही. कट्ट्यावर येणाऱ्या प्रेक्षकवर्गात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सध्या दोन महिने प्रात्यक्षिक कट्टा सुरू न करण्याचे ठरविले आहे. दोन महिने करोनाची परिस्थिती पाहून ऑगस्ट महिन्यात कट्ट्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम प्रात्यक्षिकरित्या आयोजित करून कट्टा सुरू करण्याचे ठरविले आहे, तोपर्यंत दर महिन्याच्या एक किंवा दोन दिवस कट्ट्याचा कार्यक्रम हा ऑनलाइन स्वरूपात आयोजित केला जाईल. – शीला वागळे, अध्यक्ष, आचार्य अत्रे कट्टा, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural event organizers corona virus infection corona test corona akp
First published on: 09-06-2021 at 00:09 IST