scorecardresearch

कल्याण रायते गावात डोंगर चढाव-उतारावर सायकलपटूंचा थरार ; कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे सायकल स्पर्धेचे आयोजन

भारतीय वैद्यकीय संघटना कल्याण शाखेचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत पाटील यांनी स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखविला.

Bicycle competitions
सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे सायकल स्पर्धेचे आयोजन( प्रतिनिधिक छायाचित्र )

कल्याण- गेल्या दोन वर्षापासून करोना महासाथीमुळे आयोजित करता न आलेली कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनची डोंगर चढ उतारावरील सायकल स्पर्धा यावेळी कल्याण जवळील रायते गाव हद्दीतील डोंगर चढ-उतार भागात आयोजित केली होती. हिरवाईने नटलेले डोंगर, चिखलेल्या भरलेल्या पायवाटा, पक्ष्यांचा कलकलाट, मध्येच पाऊस वाऱ्याची झुळूक, अशा निसर्गरम्य वातावरणात देशभरातील ७५ सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

भारतीय वैद्यकीय संघटना कल्याण शाखेचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत पाटील यांनी स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखविला. अत्याधुनिक सायकलवरील ७५ सायकल स्वारांची आपले विजयाचे ध्येय गाठण्यासाठी धडपड सुरू झाली. स्पर्धा वाटेतील चिखल, दगड, माती, गवत तुडवत, वाटेत दिसणाऱ्या बेडकाला हुलकावणी देत स्पर्धक डोंगर चढाव, उतारावर आपल्या कौशल्याचा कस लावत होते. परिसरातील रहिवाशांनी सायकलपटूंचे थरार पाहण्यासाठी गर्दी केली होती.

करोना महासाथीच्या दोन वर्षात ही स्पर्धा न झाल्याने अधिक संख्येने स्पर्धक यावेळी सहभागी झाले होते. वाढत्या स्पर्धक संख्येचा विचार करून फाऊंडेशनने स्पर्धेची जय्यत तयारी केली होती. कल्याण, डोंबिवलीसह मुंबई, राजस्थान, आसाम, बेंगळुरू, गोवा व इतर राज्यातील ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या काही दिग्गज खेळाडूंचाही यात समावेश होता. ११ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, पुरुष गट, इन्ड्युरो स्टेज फुल सस्पेन्शन आणि हार्ड ट्रेल अशा पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

फाऊंडेशनच्या माध्यमातून रोड सायकलिंग, माऊंटन बाईकिंग, महिला सायकलिंग आणि ज्युनिअर सायकलिंग आदी उपक्रम राबवतो. देशभरात आम्ही १२ हजार तर कल्याण परिसरातून दोन हजार सायकलपटू संघटित केले आहेत, अशी माहिती कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अव्दैत जाधव यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे स्वामिनाथन अय्यर, सतीश द्विवेदी यांच्यासह अनेक सदस्यांनी मेहनत घेतली. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे रायते गावातील ७५ विद्यार्थ्यांना शालेय मदतीचे वाटप करण्यात आले.

पर्वत, डोंगर भागात स्पर्धेतून सायकल चालविणे हा साहसी खेळ जगभरात ओळखला जातो. या खेळाचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या उद्देशाने कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशन मागील सात वर्षांपासून या स्पर्धा घेते. ज्या गोष्टी आपण सायकलच्या माध्यमातून मुंबई, देशाच्या इतर भागात करतो, त्या कल्याण परिसरात आपण देऊ शकतो, या अनुषंगाने आम्ही या स्पर्धा कल्याण परिसरातील डोंगर भागात आयोजित करतो.- डाॅ. अव्दैत जाधव
संस्थापक, कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशन.

रायते माऊंटन बाईकिंग स्पर्धेतील गटनिहाय विजेते

पुरुष गट : विठ्ठल भोसले, अनुप पवार, सतीश कुमार, सुधांशू वर्मा

११ वर्षांखालील गट : आरव जिवानी, जाज्वल्य सूर्यवंशी, पार्थ झोपे

१६ वर्षांखालील गट : स्वराज गावडे, सर्वेश मोरे, ओम खर्चे

इंड्यूरो फुल सास्पेशन : आर्णव, विरेंद्र, प्रद्युम्न

इंड्यूरो हार्ड ट्रेल : वरुण दत्त, कशिश कदम, कपिल

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cycle competition trembling cyclists hillside kalyan raite village organized kalyan cyclists foundation amy