‘लोकसत्ता ठाणे’मधील वृत्तानंतर प्रशासनाची तत्परता
ठाणे आणि त्या पुढील पट्टय़ातील क्रीडापटूंना सरावासाठी हक्काचे व्यासपीठ असलेले दादोजी कोंडदेव स्टेडियम अखेर खेळाडूंसाठी खुले करण्यात आले. यंदा अवर्षणातच संपलेला पावसाळी हंगाम उलटून दीड महिना लोटल्यानंतरही हे मैदान बंद होते. पर्यायाने अनेक क्रीडापटू स्टेडियमच्या पायऱ्यांवर सराव करत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाने स्टेडियम खुले केले.
दादोजी कोंडदेव स्टेडियम पावसाळ्याचे चार महिने नियमाप्रमाणे बंद असते. या काळात येथे पावसामुळे चिखल होतो तसेच गवत उगवलेले असते. त्यामुळे पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर मैदानातील गवत कापून तसेच सपाटीकरण करून ते खेळाडूंना खुले करण्यात येते. नियमाप्रमाणे हे मैदान ऑक्टोबरमध्ये खुले होणे अपेक्षित असते. मात्र, नोव्हेंबर महिना उजाडला तरी या कामांचा पत्ता नव्हता व गवत कापण्याचे काम संथगतीने सुरू होते. यामुळे खेळाडूंना दीड महिना सरावाशिवाय काढावा लागला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. याबाबत क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत असतानाच, पालिकेने २० नोव्हेंबरपासून हे स्टेडियम सरावासाठी खुले केले.
दरम्यान, हे स्टेडियम वेळेआधीच सुरू झाले असल्याचा खुलासा ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी केला. ‘दरवर्षी साधारणपणे १५ नोव्हेंबरपासून दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्ससाठी खुले करण्यात येते. यावर्षी अ‍ॅथलेटिक्सच्या प्रशिक्षकांनी आवश्यक त्या मुलांची निवड झालेली असल्याने मैदान खुले करून मिळावे अशी विनंती केल्यामुळे १२ नोव्हेंबरपासून मैदान खुले करण्यात आले,’ असे माळवी यांनी ‘लोकसत्ता ठाणे’कडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याच वेळी खेळाडूंच्या सरावासाठी मैदान खुले होण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी कबूल केले. ‘या काळात मैदानावर एन.टी.केळकर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यानंतर ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव यांनी रोिलग करण्याबाबत सूचना केली, त्यामुळे तीन दिवस रोलिंगसाठी स्टेडियम बंद करण्यात आले होते,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.