उद्योगबंदीमुळे कारखान्यांना टाळे, स्थानिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड
चिनी कंपन्यांकडून मिळत असलेल्या खडतर आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांद्वारे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या डहाणूतील फुगे कारखानदारांना येथील उद्योगबंदीचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील फुगेनिर्मितीचे अनेक कारखाने गुजरातमधील उमरगाव येथे स्थलांतर करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका परिसरातील हजारो कुशल-अकुशल आदिवासी कामगारांना बसला असून त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
डहाणू तालुक्यातील डहाणू, वडकून, सरावली, सावरा, आशागड, गंजाड, वाणगाव आदी गावांमध्ये १९६२पासून फुगेनिर्मितीचे अनेक कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांमध्ये एकूण आठ ते दहा हजार कामगार काम करतात. त्यातही स्थानिक आदिवासी पुरुष व महिलांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय फुग्यांची पाकिटे तयार करण्याचे, पॅकिंग करण्याचे आणि छपाई करण्यासारखे अनेक उद्योग या कारखान्यांच्या भरवशावर चालत असून त्यातूनही शेकडो जणांना रोजगार मिळतो. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने फुगे निर्मिती करण्यात येत असल्याने मोठय़ा मनुष्यबळाची गरज लागते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चिनी कंपन्यांनी बनवलेल्या फुग्यांची मागणी वाढली आहे. अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने बनवण्यात येणारे हे फुगे दिसायला आकर्षक आणि स्वस्त असल्याने त्यांना बाजारात अधिक पसंती मिळत आहे. परिणामी डहाणूतील फुग्यांची मागणी घटत चालली आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षभरात या परिसरातील दहा फुगेनिर्मिती कारखाने बंद पडले आहेत.
चिनी कंपन्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी डहाणूतील काही फुगे कारखानदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. कमी वेळेत आणि कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या फुगेनिर्मिती यंत्रांची किंमत दोन कोटींच्या वर आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ आणि महाराष्ट्रातील भिवंडी येथे अशी यंत्रे कार्यरत आहेत. त्यामुळे डहाणूतील कारखानदारांनीही अशी यंत्रे खरेदी केली. मात्र डहाणू तालुक्यातील उद्योगबंदीचा फटका या कारखानदारांना बसला आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा मानल्या जाणाऱ्या डहाणू तालुक्याला केंद्र सरकारने १९९१मध्ये ‘हरित क्षेत्र’ म्हणून अधिसूचित केले आहे. त्यामुळे येथे पिठाची चक्की सुरू करायची म्हटले तरी पर्यावरण विभागाच्या अटींची पूर्तता करावी लागते. याच धोरणाचा फटका फुगे कारखानदारांना बसत आहे. डहाणूत उद्योग चालवणे शक्य नसल्याचे दिसून आल्यानंतर येथील ६ ते ८ कारखानदारांनी गुजरातच्या उमरगाव येथे जमीन खरेदी केली आहे. वीज आणि पाण्याची सोय झाल्यानंतर हे कारखाने गुजरातला स्थलांतरित होणार आहेत. याचा मोठा परिणाम परिसरातील रोजगारक्षमतेवर होणार असून, कारखान्यांच्या स्थलांतरामुळे ७ ते ८ हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, डहाणूतील उद्योगबंदीचे नियम शिथिल करावेत, यासाठी ४० ते ५० कारखानदार सरकारदरबारी खेटे घालत आहेत, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.