ठाणे : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी १० थर लावून विक्रम केला. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी तात्काळ कोकण नगर गोविंदा पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करुन “काही गोविंदा पथकांना वाटत होते की, आमचा विक्रम कोणी मोडणार नाही” असे विधान केले होते. परंतु याच ठिकाणी जय जवान गोविंदा पथक गेले. त्यांनी सरनाईक यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी १० थर रचले आणि व्यासपीठावर जल्लोष केला. त्यानंतर ते मनसेच्या हंडीत आले. तेथेही त्यांनी १० थर रचले. जय जवाननी अविनाश जाधवांसोबत गुलाल उधळला, बाप-बाप होता है… असे म्हणत जल्लोष केला.
कोकण नगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये १० थर रचले होते. या गोविंदा पथकाने १० थर रचून विश्व विक्रम केला होता. परंतु मागील काही महिन्यांपासून जय जवान गोविंदा पथकही १० थरांसाठी सराव करत होते. त्यांनी मुंबई येथे एका ठिकाणी १० थर रचले. त्यानंतर ते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी १० थर रचले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावतीने देखील ठाण्यातील भगवती मैदानात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी देखील जय जवान गोविंदा पथक दाखल झाले. तिथेही त्यांनी १० थर रचून वेगळा विक्रम केला.
प्रो-गोविंदा आणि जयजवान
– प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांच्या वतीने प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केली जाते. प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाची तिसऱ्या पर्वात सहभागी होण्याची संधी हुकली होती. आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा आरोप जय जवान पथकाने केला होता. यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी देणे नडले की काय, अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. त्यात जय जवान गोविंदा पथकाने नोंदणी करण्यास उशीर केल्यामुळे नियमानुसार तिसऱ्या पर्वात संधी दिली नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने दहा थरांचा विश्वविक्रम केल्यानंतर सरनाईक यांनी “काही गोविंदा पथकांना वाटत होते की, आमचा विक्रम कोणी मोडणार नाही” असे विधान केले होते. मंत्री सरनाईक यांनी प्रतिक्रीया देताना जय जवान पथकाला टोला लगावल्याची चर्चा होती.
तीन वेळा १० थर आणि जल्लोष
– मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या हंडीत हे पथक दरवर्षी रात्री सहभागी होत असते. प्रताप सरनाईक यांच्या हंडीत १० थर लावल्यानंतर ते जाधव यांच्या हंडीत पोहचले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी १० थर लावले. जय जवान पथकाने एकदा नव्हे तर एकाच दिवसात तीन वेळा तीन ठिकाणी १० थर लावल्याने अविनाश जाधव यांनी व्यासपीठावरून खाली उतरत जय जवान सोबत जल्लोष केला. गुलाल उधलला. जय जवान पथकाने अविनाश जाधव यांना उचलून घेतले होते. त्यावेळी जय जवान आणि जाधव यांनी ‘बाप बाप होता है’ अशा घोषणा दिल्या.