Dahi handi 2025, Thane News ठाणे – ‘ढाक्कुमाकुम’, ‘ढाक्कुमाकुम’ चा सूर अवघ्या दोन दिवसात मुंबई, ठाणेसह उपनगरांमध्ये घुमणार आहे. सर्वत्रच दहिहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिकांची असणार आहेत. अशातच मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी देखील बघ्यांची गर्दी होत असते. त्याचबरोबर या हंड्यांना विविध अभिनेते, अभिनेत्री, लावणी सम्राज्ञींची उपस्थिती असते. अशातच ठाण्यातील मानाच्या हंड्यांना यंदाही विविध कलाकारांची उपस्थित असणार आहे. ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडी असणार आहेत.

गोपाळकाळाच्या निमित्ताने यंदा ठाण्यात विविध मानाच्या दहीहंड्यांचा थरार रंगणार आहे. पारंपरिक साहसी खेळ, विक्रम, बंपर बक्षिसांची बरसात आणि बॉलिवूड- मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती या यांचा अनोखा संगम असणार आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्कृतीची दहीहंडी

वर्तकनगर, ठाणे ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दहिहंडीच्या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिले जाईल. तसेच यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्व विक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे प्रतिनिधी टोनी, ऍना तसेच महाराष्ट्र गोविंदा असोसिएशनचे बाळा पडेलकर, गीता झगडे, अभिषेक सुर्वे, बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे १११ स्पॅनिश खेळाडू (castellers) या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत असून मानवी मनोरे ( Human Pyramid) सादर करतील.

संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी, रघुनाथनगर, वागळे इस्टेट

रविंद्र फाटक ((Ravi phatak) यांच्या संकल्प प्रतिष्ठान २० व्या वर्षाचा भव्य दहिहंडी सोहळा आयोजित केला आहे. संकल्पच्या दहिहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल असमार आहे. तसेच प्लॅनेट मराठीतर्फे अनेक मराठी सिने कलाकार तसेच अमिर हडकर यांच्या हास्य जत्रा टीम आणि स्वामी समर्थ इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य अविष्कार सादर करून गोविंदांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. तसेच यंदा देशाची राजधानी दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात येणार आहेत. तसेच सेलिब्रिटी हंडी हे विशेष आकर्षण असणार आहे.

रेमंडमधील दहीहंडी ‘गोविंदां’ची ‘पंढरी’ मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवाशी संकुलात यंदा प्रथमच ”ढाक्कुमाकुम”चा सूर घुमणार आहे. `युवा स्टार प्रतिष्ठान”चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरविण्यात येणार आहे. या दहीहंडी सोहळ्यात अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा फॅशन शो हे कार्यक्रमही असणार आहेत.

टेंभी नाका दहीहंडी

धर्मवीर आनंद दिघे यांची हंडी म्हणून या दहीहंडी विशेष महत्व आहे. त्यामुळे टेंभीनाक्याची ही दहीहंडी मानाची हंडी म्हणून प्रसिद्ध आहे. या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य आणि संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आणि जल्लोषमय गाणी असणार आहेत.