ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून त्याचप्रमाणे ते दहीहंडी या खेळाचा क्रीडा प्रकारात लवकरच समावेश करतील. पुढील वर्षाच्या आत दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात होऊन इतर खेळाप्रमाणेच राज्यभरात दहीहंडीच्या स्पर्धा होतील आणि त्याचबरोबर गोविंदाना नोकरीची संधी मिळेल, असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंबंधी केलेली मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य करत त्याबाबतचा निर्णय जाहीर केला. सार्वजनिक सुट्टी असल्याने दहीहंडीचा उत्सव तरुणाईला आनंदाने साजरा करता येणार असून नागरिकांनाही उत्सवात सहभागी होऊन गोविंदा पथकांचा थरार पाहणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे दहीहंडी या खेळाचा क्रीडा प्रकारात लवकरच समावेश करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. स्पेन देशात मानवी मनोरे रचने हा खेळ खेळला जातो आणि त्यांचे खेळाडू जगभर त्यासाठी फिरतात. स्पेन पेक्षा चांगले मानवी मनोरे आपले गोविंदा पथके रचतात. त्यामुळेच त्यांना क्रीडा प्रकारात अधिकृत समावेश करुन खेळाचा दर्जा द्यावा अशी मागणी गेले अनेक वर्षे करीत आहे. त्याबाबतचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे हे घेतील. आनंद दिघे यांनी ठाण्यात हिंदू उत्सव अधिक भव्य प्रमाणात साजरे करण्यास सुरुवात केली. दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव सुरुच ठेवला. आमच्या सारखेच तेही दहीहंडी उत्सव आयोजित करतात. त्यामुळे पुढील वर्षाच्या आत दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात झालेला असेल, असे सरनाईक यांनी सांगितले. क्रीडा प्रकारात दहीहंडी समाविष्ट झाल्यास शासकीय नोकरींमध्येही गोविंदाना आरक्षण मिळू शकेल. त्यात चांगले गोविंदा सरकारी नोकरीत कामाला लागतील. तसेच अधिकृतपणे वर्षभर याच्या स्पर्धा होऊ शकतात आणि अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून दहिहंडीला मान्यता मिळाल्यानंतर गोविंदा जगभर जाऊ शकतात, भविष्यात दहीहंडीचा समावेश ऑलिम्पिकमध्ये सुध्दा होईल, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्कृति युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन व शिवसेना यांच्यातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन ठाण्यात करण्यात येणार आहे. सुरक्षेचे सर्व नियम पालन करुन हा उत्सव होणार असून दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास २१ लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. या दहिहंडी उत्सवात येणाऱ्या प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या थर लावतील तसे बक्षिस दिले जाईल. लाखो रूपयांची बक्षिसे आहेत. यंदा राज्य सरकारने उत्सव निर्बंधमुक्त केले असल्याने राज्यातील सर्व छोट्या मोठ्या उत्सव आयोजकानी जास्तीत जास्त प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून बाक्षिसे जाहीर करावीत. जेणेकरून अधिकाधिक गोविंदा पथके यात सहभागी होतील. या दहीहंडी पथकाच्या माध्यमातून वर्षभर लोकांची सेवा होत असते. जी बक्षिसे मिळतात त्यातून सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम वर्षभर होतात. त्यामुळे दहीहंडी पथकाना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दौऱ्यांदरम्यान शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करीत असून याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, ठाकरे कुटूंबियांविषयी काहीच भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले.