शहापूर : तालुक्यातील भातसा धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी सकाळी उघडण्यात आले. भातसा धरण परिसरात पावसाचे वाढणारे प्रमाण लक्षात घेऊन धरणाचे दरवाजे ०.५० मीटर ने उघडण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामधून ९ हजार ६३०. ४० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत असल्याने भातसा नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणारी शहापूर तालुक्यातील तानसा व वैतरणा याआधीच भरून वाहू लागली आहेत.
याआधी ऑगस्टमध्ये भातसा धरणाचे दोन दरवाजे ० .२५ मीटरने उघडण्यात आले होते त्यावेळी १ हजार २४६.२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. भातसा धरण परिसरात आत्तापर्यंत २३१८.०० मिमी इतका पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी एकूण २५२०.०० मिमी पाऊस झाला होता. धरणातील एकूण पाणीसाठा ९६७.२९३ द.ल.घ.मी. इतका असून उपयुक्त पाणीसाठा ९३३.२९३ द.ल.घ.मी. आहे. धरणाच्या पाण्याची पातळी १४१.७० मीटर एवढी आहे तर धरणाची पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.