डोंबिवली – डोंबिवली पूर्व सर्वाधिक वर्दळीच्या श्री गणेश मंदिराजवळील बापूसाहेब फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकात गुरूवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे शिवसेनेकडून दहीहंडी सराव उपक्रमाचे आयोजन केले आहे. या कालावधीत बापूसाहेब फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौक सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवासी, वाहन चालक आणि या भागातील व्यापारी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

दहीहंडी सरावासाठी डोंबिवली शहरात अनेक मोकळी मैदाने, सावळाराम महाराज क्रीडासंकुल असताना डोंबिवलीतील मुख्य वर्दळीचा रस्ता सकाळपासून मदन ठाकरे चौक भागात बंद करण्यात आल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. सणासुदीचे दिवस आहेत. नागरिक खरेदीसाठी अधिक संख्येने बाहेर पडतात. अशा वेळेत आमच्या दुकानांसमोर भव्य मंडप आणि कार्यक्रम असला की ग्राहक आमच्या दुकानापर्यंत येऊ शकत नाही. अनेक वेळा आम्हाला दुकाने बंद करण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात येतात. त्यामुळे सणांच्या काळात आमचे आर्थिक नुकसान होते, अशा प्रतिक्रिया फडके रस्त्यावरील काही व्यापाऱ्यांनी दिल्या.

शहराच्या अनेक भागात पालिका, पोलिसांच्या परवानग्या घेऊन मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर दहीहंंडी उत्सवासाठी मंडप उभारणी झाली आहे. त्यामुळे या भागातून वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. बापूसाहेब फडके रस्त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेकडून गुरूवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहीहंडी पथकांचा भव्य सराव कार्यक्रम आयोजित केला आहे. या सराव कार्यक्रमासाठी मंडप उभारणीच्या कार्यक्रमासाठी सकाळपासून मदन ठाकरे चौक भागातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

संध्याकाळच्या वेळेत नेहमीच वाहनांनी गजबजून कोंडीत अडकणारा फडके रस्ता गुरूवारी ठाकरे चौक भागात रस्ता बंद असल्याने कोंडीमुळे जाम होण्याची शक्यता आहे. सकाळपासून वाहन चालक ठाकरे चौकाच्या अंतर्गत गल्ली रस्त्यांमधून वाट काढत इच्छित स्थळी जात आहेत. दहीहंडी पथके आणि त्यांची वाहने संध्याकाळी पाच ते रात्री दहा कालावधीत फडके रस्त्यावर येणार असल्याने संंध्याकाळी या रस्त्यावरून वाहने कशी न्यायची या विवंचनेत रिक्षा चालक आहेत.

गणपती मिरवणुका

दररोज संध्याकाळी डोंबिवली शहराच्या विविध भागातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती मंडपात नेण्यासाठी वाजतगाजत मिरवणुका काढत आहेत. नोकरदार वर्ग घरी परतण्याच्या वेळेत आणि रस्त्यावर अधिक संख्येने वाहने असण्याच्या वेळेत या मिरवणुका हौशी मंडळांकडून काढण्यात येत असल्याने शहराच्या विविध भागातील रस्ते दररोज वाहतूक कोंडीत अडकत आहेत. अगोदर वाहन चालक, प्रवासी खड्डे, रस्ते दुर्दशामुळे त्रस्त आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून संध्याकाळच्या गणपती मंडपात नेण्याच्या मिरवणुका काढण्यात येत असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. खड्ड्यांमुळे गणपती सावकाश घेऊन जावा लागतो. त्यामुळे गणपती मिरवणुकांच्या मागे वाहनांच्या रांगा लागतात.