ठाणे – गणेशोत्सवात सगळीकडे नवनवीन संकल्पना, विविध रंगांची सजावट आणि भक्तीभावाने सजलेले घरगुती तसेच सार्वजनिक मंडप हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बाप्पाला खूश करण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या संकल्पना साकारत असतात. यंदा ठाण्यातील दास कुटुंबियांनी मात्र महत्त्वपूर्ण संकल्पना साकारत पर्यावरणपूरकतेचा संदेश दिला आहे. जुन्या पुस्तकांचा वापर करून केलेली त्यांची सजावट विशेष आकर्षण ठरत आहे.

गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात घरगुती गणेशोत्सवातील विविध संकल्पनांवर आधारित देखावे लक्षवेधी ठरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दास कुटुंबीय आपल्या घरगुती गणेशोत्सवात नेहमीच समाजोपयोगी संदेश देणारी तसेच पर्यावरणपूरक अशी सजावट करतात.

प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या प्रदूषण करणाऱ्या वस्तूंना पूर्णतः दूर ठेवून नैसर्गिक साहित्य, कागद, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून त्यांनी सजावट करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. मागील वर्षी या कुटुंबाने ‘बांबू, कागद आणि सुतळी’च्या मदतीने तयार केलेली रिक्षाची प्रतिकृती लोकांना आकर्षित करून गेली होती. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा त्यांनी “ज्ञानाचे महत्त्व आणि पर्यावरणपूरकता” या दोन संदेशांवर आधारित सजावट केली आहे.

या सजावटीत सर्वात लक्षवेधी ठरत आहे ते म्हणजे मोठ्या पुस्तकाची प्रतिकृती. या पुस्तकावर मध्यभागी “श्री गणपती” असे अक्षर लिहिलेले आहे. पुस्तकासोबत कबुतराच्या पिसावर आधारित एक लेखणी साकारण्यात आली आहे. सजावटीच्या तळाशी जुन्या दुमडलेल्या पुस्तकाचा कलात्मक वापर करून त्याला शोभा आणली आहे. तर सजावटीच्या मागील बाजूस खरी फांदी लावून त्यावर जुन्या पुस्तकांच्या पानांपासून बनवलेल्या पानांची जोडणी केली आहे. या अनोख्या संकल्पनेतून दास कुटुंबियांनी दोन संदेश दिले आहेत.

एकीकडे जुन्या पुस्तकांच्या माध्यमातून ‘ज्ञान, शिक्षण आणि संस्कार’ यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रत्येक घरात जपले जाणारे ज्ञानाचे दालनच बाप्पाच्या स्वागतासाठी सजवले, याला वेगळेच सांस्कृतिक मूल्य प्राप्त झाले आहे. दुसरीकडे प्लास्टिक आणि थर्माकोलसारख्या पर्यावरणाला हानिकारक वस्तूंचा वापर करण्याऐवजी पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक सजावट करून त्यांनी हरित गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.