असंघटित कामगार क्षेत्रातील आदीवासींसाठी केलेल्या कामासाठी सन्मान
गेल्या रविवारी कल्याण येथील वामनराव पै सभागृहात आयोजित एका समारंभात रायगड जिल्ह्य़ातील असंघटित कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते दिलीप डाके आणि मुरबाड येथील श्रमिक मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते दशरथ वाघ यांचा अनुक्रमे ज्येष्ठ कामगार नेते बगाराम तुळपुळे आणि स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीच्या नेत्या सुनिती सु. र. कार्यक्रमास उपस्थित होत्या.
रायगड जिल्ह्य़ात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या श्रमिक क्रांती संघटनेत १९९८ पासून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत असणाऱ्या दिलीप डाके यांनी अनेक प्रकरणात आदिवासींना न्याय मिळवून दिला. आदिवासींचे शोषण करणाऱ्या राजकीय प्रवृत्तींना त्यांनी कायद्याने शिक्षा ठोठावण्यास भाग पाडले. गेली दोन दशके अखंडपणे डाके रायगडमधील आदिवासी वस्त्यांमध्ये काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बगाराम तुळपुळे स्मृती पुरस्कार देण्यात आला.
दशरथ वाघ ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात १९९५पासून कार्यरत आहेत. पाडय़ांवरील आदिवासींना जमीनदार, सावकार वेठबिगारासमान वागणूक देत. अत्यल्प मजुरीवर कामे करून घेत. त्याविरोधात आदिवासींना संघटित करून वाघ यांनी आंदोलन केले. संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समूहांना वन जमिनीचे पट्टे मिळाले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकदत्ताजी ताम्हणे पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली.