ठाणे – भारत देश हा तरुणांचा देश आहे. ही तरुण पिढी आपल्या भारत देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. ठाणे शहरात यंग इंडिया ऍथलिट्स संस्थेच्या वतीने यंग इंडिया मॅरेथॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनच्या शुभारंभाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उपस्थित स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ठाणे शहरात दरवर्षी आयोजित केली जाणारी वर्षा मॅरेथॉन ही स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेली असून, ते या मॅरेथॉनचे खऱ्या अर्थाने जनक आहेत. त्यांनी ठाण्यात वर्षा मॅरेथॉन सुरु केली. त्यानंतर, महापौर वर्षा मॅरेथॉन झाली, त्यापाठोपाठ अनेक मॅरेथॉन शहरात सुरु झाल्या आहेत. आता, यंग इंडिया ऍथलिट्स संस्थेच्या वतीने मॅरेथॉन २०२५चे आयोजन करण्यात आले आहे.

या मॅरेथॉनमध्ये २ हजार धावपटू धावणार आहेत. मॅरेथॉन ही स्पर्धा निरोगी आरोग्यासाठी असल्याची जागृकता सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये प्रत्येकजण धावणार आहे तो स्वतःसाठी, शहरासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि सशक्त व समृद्ध भारत साकारण्यासाठी, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. ठाणे हे विकासाचे शहर आहे, ठाणं हे बदलत आहे, शहराचा विकास होतोय आणि प्रगती होत आहे आणि या ठाण्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी आपण सगळेजण एकत्र धावूया असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनचा शुभारंभ केला.