ठाणे : ‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, असे आम्ही इतरांसाखरे वागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मंगळवारी ठाण्यात पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना लगावला. अडअडचणीत, सुख-दु:खात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहीले तरच पक्ष वाढतो आणि आम्ही तेच करत असल्यामुळे आमचा पक्ष वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे येथील आनंदाश्रमात मंगळवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नौपाड्यातील उबाठा गटाचे उपविभागप्रमुख प्रितम रजपूत, उपविभागप्रमुख राजेश पवार, गट प्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे.

ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान ७२ नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला.

आतापर्यंत मुंबईतील ७० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरुन खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते. शिवसेना आणि उबाठामध्ये हा फरक आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.

आपल्याला आता शिवसेना गावागावात वाढवायची आहे. घराघरात शिवसेना न्यायची आहे. लोकांच्या मनामनात शिवसेना पोहचवायची आहे. आपल्याला सरकारने केलेले काम आहे, ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे, असेही ते म्हणाले. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काही लोक त्याच्याकडे पाहत होते. परंतु मुंबईकर त्रस्त होता. मुंबईकर अडचणीत होता.

मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता, त्यांच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता. धोकादायक इमारतींचा प्रश्न होता. हे प्रश्न सोडविण्याचे काम हाती घेतले आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही काम केली. यामुळे मुंबई महापालिकेतील उबाठासह इतर पक्षाचे ७० नगरसेवक आमच्या पक्षात सामील झाले, असेही ते म्हणाले.

विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकेल

अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.