scorecardresearch

डोंबिवलीत फडके रोडवरील सराफावर जीवघेणा हल्ला

हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर दुकानातील एकही ऐवज लुटून नेला नाही. सात सेकंदाच्या आत ही घटना घडली

डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रोड जवळच्या आगरकर रस्त्यावरील एका जवाहिऱ्याच्या दुकानात घुसून एका अज्ञात बुराखाधारी इसमाने दुकान मालकावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जवाहिऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले, तारकानाथ मन्ना (५४) यांचे डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील आगरकर रस्ता येथे मन्ना ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सकाळी नऊ वाजता उघडलेले दुकान रात्री १० वाजता बंद केले जाते. दुकान मालक तारकानाथ बुधवारी दुकानात बसले होते. अचानक एक बुरखाधारी दुकानात घुसला. त्याला काही खरेदी करायचे आहे म्हणून तारकानाथ उठून त्याला सामोरे गेले. बेसावध असलेल्या तारकानाथ यांच्या पोटावर, छातीवर बुरखाधारी इसमाने धारदार शस्त्राने वार केले. पकडले जाण्याच्या आत हल्लेखोर पळून गेला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने तारकानाथ बेशुध्द पडले. ही माहिती कळताच तात्काळ आजुबाजुच्या सराफांनी ही माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दुकानातील, दुकानालगत असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर दुकानातील एकही ऐवज लुटून नेला नाही. सात सेकंदाच्या आत ही घटना घडली आहे.

हल्ल्याचे नक्की कारण माहिती नाही. मात्र हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. यासाठी तपास पथक तयार केले आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. फडके रोडसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर व्यापारी, सराफांवर हल्ले होऊ लागले तर व्यवसाय करायचा कसा, शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असे प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. तारकानाथ मन्ना हल्ला प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी डोंबिवली जवाहिर संघटनेचे अध्यक्ष सागरमल इंटोदिया यांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवलीत भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रहिवासी हैराण असतानाच, आता दिवसाढवळ्या दुकानात घुसून एका सराफावर हल्ला झाल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deadly attack on gold trader on phadke road in dombivali asj print news asj