शासकीय मुर्दाड व्यवस्थेच्या बेपर्वाईने ठाण्यात मंगळवारी एका बाळाचा बळी घेतला. केवळ वैद्यकीय चाचणीसाठी ८०० रुपये नसल्यामुळे अडलेल्या गरोदर महिलेला रुग्णालय व्यवस्थापनाने थोडीही कणव न दाखवता बाहेर काढले आणि ती रस्त्यातच प्रसूत होऊन तिचे बाळ दगावले. तर डोंबिवलीतील रुग्णालयातून एका पाच दिवसांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकून तिचा जीव घेण्यात आला.
पाच दिवसाच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले
‘मुलगी वाचवा’साठी देशभर जागृती सुरू असतानाच डोंबिवलीत मात्र याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून पाच दिवसांच्या मुलीला क्रूरपणे फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी बाळाचा मृतदेह आढळल्यावर खळबळ उडाली.
अंबरनाथजवळील नारेन गावची सुजाता गायकवाड (वय २४) ही महिला डोंबिवलीतील शुभदा नर्सिग होममध्ये रविवारी प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. गुरुवारी त्यांना घरी पाठविण्यात येणार होते. सकाळी बाळाची आंघोळ झाल्यानंतर त्याला पाळण्यात ठेवण्यात आले होते. या खोलीमध्ये अन्य चार महिला तसेच त्यांचे नातेवाईक होते. तेव्हा सुजाताला बाळ पाळण्यातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध केल्यानंतर बाळ इमारतीखाली मृतावस्थेत आढळले. रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. हर्षदा प्रधान यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना कळवले.
पैशाअभावी रुग्णालयाबाहेर काढलेल्या महिलेची रस्त्यात प्रसूती, बाळ दगावले
एका अडलेल्या महिलेची करुण स्थिती पाहूनही शासकीय दगडांचे मन द्रवले नाही. अशा मुर्दाड प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे त्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आणि बाळाने नंतर काही तासांतच जगाचा निरोप घेतला. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका अडलेल्या गर्भवती महिलेकडे वैद्यकीय चाचणीसाठी आठशे रुपये नसल्याने तिला बाहेर काढले. मात्र बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली.
दरम्यान, या प्रकरणाची कळवा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शिवाय कळवा रुग्णालयाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्यासाठी खातेप्रमुखांना पत्र पाठविले आहे.
गंगाराम घोडे हे १० मार्चला जालन्याहून कल्याणमध्ये मजुरीच्या कामासाठी आले. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी शारदा होती. प्रवासादरम्यान बॅग चोरीला गेल्यामुळे तिची शोधाशोध करत असतानाच शारदाच्या पोटात कळा येऊ लागल्या. यामुळे कल्याणमधील रुक्मिणी रुग्णालयात त्यांना प्रथम दाखल करण्यात आले. मात्र, तेथे पुरेशा सुविधा नसल्यामुळे त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात नेले. तेथे प्रसूती विभागाच्या बाह्य़रुग्ण विभागात त्यांना बसवून वेदना कमी होण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर एका नर्सने वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांच्याकडे आठशे रुपये मागितले. मात्र, बॅग चोरीला गेल्याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच नर्सने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला, असा आरोप गंगाराम घोडे यांनी केला आहे. रुग्णालयातून बाहेर काढल्याने मुंब्य्राच्या दिशेने जात असताना रस्त्यावरच त्यांची प्रसूती झाली. हा प्रकार पाहून एका रिक्षाचालकाने त्यांना मुंब्रा स्थानकात सोडले. तिथेच त्यांनी संपूर्ण रात्र घालविली. पण, तिथे त्या नवजात बालकाचा काही तासांत मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप गंगाराम यांनी केला असून, या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत बालकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घोडे दाम्पत्याने घेतली आहे. यासंदर्भात कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठाता सी. मैत्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तसेच या प्रकरणाचा अहवाल संबंधित खातेप्रमुखांकडून मागविण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन बाबर यांनीही या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू असल्याचे सांगितले.