ठाणे विद्यासेवक पतपेढीचा निर्णय, सव्वा कोटींचे कर्ज माफ
अंबरनाथ : करोनाच्या जागतिक आपत्तीत आपला जीव गमावलेल्या ३३ सभासदांचे तब्बल सव्वा कोटी रुपयांचे कर्ज माफ करून सभासदांच्या वारसांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय ठाण्यातील विद्यासेवक पतपेढीच्या वतीने घेण्यात आला आहे. एकीकडे घरातला कर्ता व्यक्ती करोनामुळे गमावल्याने आर्थिक संकट कोसळलेल्या कुटुंबांना बँका किंवा पतपेढय़ा वसुलीसाठी तगादा लावत आहेत. असे असताना ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले जाते आहे.
करोनाच्या संकटात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि त्याची जबाबदारी आता थेट त्यांच्या कुटुंबीयांवर येऊन पडली आहे. कर्ता व्यक्ती गेल्याने आर्थिक संकटातून वर कसे यायचे असा प्रश्न असतानाच काही बँका आणि पतपेढय़ा वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे दिसून आले आहे. मात्र याच संकटकाळात आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीने कर्जदार सभासदांच्या वारसांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवण्याऐवजी कर्जमाफी प्रमाणपत्र पाठवण्याचा दिलासादायक निर्णय घेतला. संचालक मंडळाने करोनाच्या काळात मृत पावलेल्या ३३ सभासदांचे तब्बल सव्वा कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. कर्जमाफी सोबतच ३ लाखांपर्यंतची मदतही दोन योजनांच्या माध्यमातून वारसांना देत असल्याची माहिती पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिली आहे. विद्यासेवक पतपेढीचे संस्थापक स्व. वसंतराव बापट यांच्या स्मरणार्थ सन २०११ पासून सुरू केलेल्या कर्जसंरक्षण योजनेअंतर्गत ३ लाखांची मदत व सल्लागार स्व. रामनाथ मोते ऋणमुक्ती योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाते. याच कालावधीतील सुमारे २० प्रस्ताव मुख्यालयात उशिरा प्राप्त झाल्याने त्यांच्या वारसदारांना अद्याप लाभ मिळालेला नाही. मात्र लवकरच या प्रस्तावांची छाननी होऊन संबंधितांना लवकरच लाभ दिला जाणार असल्याचे पतपेढीचे सचिव प्रा. रमेश बुटेरे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्य़ातील विविध शाखांमधील ३३ मृत सभासदांपैकी अंबरनाथ शाखेतील १२, ठाणे १०, सानपाडा १, कल्याण ६, भिवंडी ३, वाडा १ अशा वारसांना कर्ज विमा लाभ व ऋणमुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे ३३ शिक्षक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. पतपेढीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.