ठाणे: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांमध्ये करोना लसीकरण शिबिरांवरून वाद झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र असतानाच, दुसरीकडे महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी भाजप आणि मनसेने हातमिळवणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर भाजप आणि मनसे युती होण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तविली आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. ही निवडणूक तीन सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने प्रभाग रचनेचे काम सुरू केले आहे. जुन्याच म्हणजेच दहा वर्षांपूर्वीच्या जणगणनेनुसारच प्रभागांची रचना करण्याची सूचनाही निवडणूक आयोगाने दिली असून, यामुळे ठाणे महापालिकेत प्रभागांची संख्या ४४ इतकी होणार असली तरी नगरसेवकांची संख्या १३१ इतकीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोपरी, वागळे इस्टेट, घोडबंदर हा परिसर शिवसेनेचा, तर कळवा आणि मुंब्रा हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असे असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी करून ही निवडणूक लढविणार की स्वबळवार निवडणूक लढविणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांमध्ये करोना लसीकरण शिबिरांवरून वाद झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. असे असतानाच भाजप आणि मनसे युतीची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

इतिहास काय?

ठाणे महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही. २००७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. यापैकी अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत चारचे पॅनल आल्याने मनसेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता.

ठाणे महापालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. तसेच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचे आमंत्रण आले असून त्यांनी जाण्यास होकार दिला आहे. या दौऱ्यानंतरच युती होण्याची शक्यता आहे.

अविनाश जाधव, मनसे, ठाणे जिल्हाध्यक्ष

ठाण्यात भाजप आणि मनसे युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. तसेच युती आणि आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जातो. प्रदेश पातळीवर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल.

निरंजन डावखरे, भाजप, ठाणे शहराध्यक्ष