ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, मंत्र्यांचे दौरे
ठाणे : दिवंगत आनंद दिघे यांच्या जंगी जयंती सोहळय़ा पाठोपाठ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी शहरातील महत्त्वाच्या विकासकामांचा धडाका लावून सत्ताधारी शिवसेनेने महापालिका निवडणुकांचे रणिशग फुंकले आहे. तर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या शुभारंभाचे निमित्त साधत भाजपनेही शुक्रवारपासून शहरात केंद्र तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी परेड सुरू केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकांचा लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राज्यमंत्र्यांना ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकाची रपेट घडविण्याची जोरदार तयारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली असून या स्थानकांमधील रेल्वे प्रवाशांशी संवाद साधत मतांची बेगमी करण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ठाणे दौरा आयोजित करण्यात आला असून पक्षाच्या नगरसेवकांशी संवादही यावेळी साधला जाणार आहे.
ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे जलद, धिम्या लोकल गाडय़ा आणि एक्सप्रेस गाडय़ांना प्रत्येकी दोन मार्गिका उपलब्ध होणार असून यामुळे विनाअडथळा लोकल वाहतूक सुरू राहणार आहे. या मार्गिकांचे फायदे लक्षात घेता ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत या प्रकल्पाचा प्रचारासाठी पुरेपूर उपयोग करून घेण्याची रणनीती भाजपने आखली असून ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील शिवसेना खासदारांवर कुरघोडी करण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांचा स्थानक दौरा यानिमित्ताने आखण्यात आला आहे.
शुभारंभानंतर स्थानकांचे दौरे
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्गिकांचे लोकार्पण ऑनलाइन केले जाणार आहे. ठाण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दोघे उपस्थिती राहून लोकलला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक वर्षांनंतर रेल्वे मंत्र्यांचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने रेल्वे प्रशासनाबरोबरच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे. फलाट क्रमांक १ लगत भव्य शामियाना उभारला जात आहे.
श्रेयवादाची लढाई टोकाला
पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या मार्गिकेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी केली होती. असे असताना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्रातील भाजप सरकारने या मार्गिकांच्या लोकार्पण कार्यक्रम घेऊन हा प्रकल्प आपल्या सरकारच्या कार्यकाळात झाल्याचा एकप्रकारे दावा केला आहे. भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नानंतर मोदी सरकारने ठाणे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला परवानगी दिली होती. त्यानंतर रेल्वे स्थानकातील जुनी इमारत तोडून सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे, असा दावा भाजपकडून केला जात असून शिवसेनेच्या स्थानिक खासदारावर कुरघोडीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. यावरून शिवसेना व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.
फडणवीसांकडून प्रचाराचा प्रारंभ
ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेने विविध उद्घाटनांचा कार्यक्रमांबरोबर भाजप पदाधिकाऱ्यांना गळाला लावत पक्ष प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारचा दोन ते अडीच तासांचा ठाणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या हस्ते अपंग स्नेही उद्यान, मराठा सकल मोर्चा शिवसन्मान ज्योत यात्रा तसेच भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते, उद्यान, चौक आणि विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते भाजपला लागलेली गळती थांबविण्याचा तसेच निवडणुकीच्या प्रचाराचा एकप्रकारे नारळ फोडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.