उपायुक्त प्रियांका राजपूत यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपत नाराजी; ‘रिपाइं’चाही पाठिंबा
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत उपायुक्त पदावर असलेल्या प्रियांका राजपूत यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपने दंड थोपटले असून पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांकडून राजपूत यांच्या कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष महासभा बोलवण्याची मागणी केली आहे. रिपाइंच्या सदस्यांनीही याला पाठिंबा दिला असून लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांचा सन्मान करत नसल्याचा आरोप प्रियांका राजपूत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपायुक्तांना दिलेल्या विभागांवरून आयुक्तांना लक्ष्य केले होते. उपायुक्त प्रियांका राजपूत त्यांच्याकडे पालिकेतील महत्त्वाचे विभाग आहेत. त्यांच्या कामाबाबत कार्यालयात किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संवाद साधला असता त्यांची कामाची पद्धत योग्य वाटत नाही. महिला
अधिकारी असूनही पदाधिकारी व नागरिक यांच्यासोबत त्यांचे बोलणे, वागणे बरोबर वाटत नाही. राजपूत लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान देत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगत स्थायी समिती सभापती दीपक सिरवानी यांच्यासह भाजप आणि रिपाइंच्या आठ नगरसेवकांनी सह्या केलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी सभेत मांडला जाणार आहे. राजपूत यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष महासभा आयोजित करण्याची मागणी या प्रस्तावाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे राजपूत यांच्यासह आणखी इतर दोन उपायुक्तांना आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिलेल्या विभागांवरून भाजप आणि रिपाइंत गेल्या वर्षांपासून अस्वस्थता आहे. भाजपच्या गोटात दाखल झालेले रिपाइंचे उपमहापौर भगवान भालेराव यांनी आगपाखड केली होती.
गेल्या वर्षांत जुलै महिन्यात भालेराव यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलनही केले होते. त्यावेळी आयुक्त डॉ. दयानिधी यांनी ठाम भूमिका घेत उपायुक्तांवर विश्वास ठेवला होता. त्यामुळे स्थायी समितीत भाजप आणि रिपाइं सदस्यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर आता आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करून त्यांना दूर सारण्याच्या या प्रकाराचा पायंडा पडण्याची भीती काही अधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.
नियमबाह्य कामांना नकार?
करभरणा वाढवण्यासाठी प्रियांका राजपूत यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मोठय़ा थकबाकीदारांच्या मालमत्तांनाही त्यांनी टाळे ठोकले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातील काही बडय़ा नगरसेवकांचे हितसंबंध दुखावले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी आणि विशेषत: भाजप, रिपाइं नगरसेवकांच्या अनेक नियमबाह्य कामांना उपायुक्तांनी थेट नकार दिल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवरूनही राजपूत यांना लक्ष्य केले होते.