ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर कोंडीमुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे बुजविण्यासाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यातील विशेषत: घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहनचालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता येत नाही. तर विद्यार्थ्यांच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकतात. यावरून नागरिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट उपस्थित होते. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दुरध्वनीद्वारे सूचना देण्यात आल्या.

ठाण्यात कोपरी, माजिवडा तसेच घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाऊंटन हॉटेल, शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, असे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

उत्तम तंत्रज्ञानाद्वारे खड्डेमुक्ती करा’

गायमुख घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या समस्येवर अजूनही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा चांगला असावा. रस्त्यावर दुरुस्तीचे उंचवटे तयार होऊ नयेत. त्याने अपघात होतात, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरून रस्ते खड्डेमुक्त करावे, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.