ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्डे आणि वाहतुक कोंडी विषयी नाराजी व्यक्त केली असली तरी कोंडीचे आगार ठरलेल्या रस्त्यांवरील वाहतुक नियोजन करायचे कसे असा प्रश्न सर्वच यंत्रणांना पडला आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, संथगतीने सुरु असलेले प्रकल्प, अरुंद रस्ते, स्थानक परिसरात रिक्षा थांब्यांवर झालेली बजबजपुरी यावर अपयश आल्याने पुढील काही दिवसांत तरी हा प्रश्न सोडविला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत. ठाणे जिल्ह्यात नागरिकरण वाढल्यानंतर आता वाहतुक कोंडीची भीषण समस्या भेडसावू लागल्याचे चित्र निर्माण झाले. सोमवारी उपुमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ,ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत बैठक घेऊन वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येविषयी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पंरतु या कोंडीतून ठाणेकरांची सुटका होईल का असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे.

घोडबंदर मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. त्याचवेळी एमएमआरडीएच्या माध्यमातून सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणीचे काम हाती घेण्यात आले. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर बसू लागला आहे. त्यातच पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. अनेकदा या भागात अवेळी अवजड वाहनांची वाहतुक सुरु असते असा आरोप रहिवासी करतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गावरही मेट्रो मार्गिकाचे काम सुरू आहे. या मार्गिकावर मुंबईहून ठाणे, घोडबंदर, भिवंडीच्या वाहनांचा भार अधिक असतो. गेल्याकाही दिवसांपासून या मार्गावर आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम प्राथमिक टप्प्यावर सुरू आहे. महामार्ग असूनही दररोज सकाळी आणि रात्री या मार्गावर माजिवडा ते आनंदनगर जकात नाका पर्यंत वाहतुक कोंडी होते. मुंबई नाशिक महामार्गावरही खारेगाव टोलनाका मार्गापुढे दररोज वाहतुक कोंडी होते. त्यामुळे ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

विकास प्रकल्प की कोंडीचे प्रकल्प ठाणे जिल्ह्यात सध्या अनेक प्रकल्प सुरु आहेत. एकाचवेळी सुरु असलेले विकास प्रकल्प देखील याला कारणीभूत आहेत का असा प्रश्नही निर्माण होतो. मेट्रो मार्गिका काम सुरू असतानाही आनंदनगर-साकेत उन्नत मार्गिका, घोडबंदर रस्ते जोडणी प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी अधिक होते. दुसरीकडे ही कामे संथपणे सुरु असल्याने समस्या आणखी वाढू लागली आहे. ही कामे टप्प्याटप्प्याने का सुरू केली नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
कळवा-विटावा-दिघा दुर्लक्षित

एकीकडे मुख्य मार्गांवर कोंडी होत असताना ठाणे बेलापूर मार्गाला जोडणारा कळवा-विटावा-दिघा हा मार्ग दुर्लक्षित आहे. या मार्गावरून हजारो ठाणेकर नवी मुंबई गाठतात. परंतु विटावा, कळवा भागात रस्त्याची अवस्था अंत्यत वाईट आहे. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी नोकरदार येथील मार्गावरून वाहतुक करतात. परंतु या मार्गावरही आता कोंडी वाढू लागल्याचे चित्र आहे