रजनी पंडित हिची कबुली; ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर म्हणून परिचित असलेली रजनी पंडित हिने बेकायदेशीररीत्या पाच मोबाइल कॉल तपशिलाची नोंद (सीडीआर) विकत घेतल्याची कबुली ठाणे पोलिसांना दिली आहे. पाच सीडीआरपैकी तीन चुकीचे तर दोन बरोबर मिळाले असल्याचा दावा करत त्याचा वापर लग्नापूर्वीच्या चौकशीसाठी तसेच मुलगा अमली पदार्थाचे सेवन करतो का, याची पाहाणी करण्यासाठी केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे. असे असले तरी तिने यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये बेकायदेशीररीत्या सीडीआर विकत घेतल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलीस आता तपास करीत आहेत. ठाणे न्यायालयाने तिला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विविध मोबाइल कंपन्यांकडून बेकायदा सीडीआर मिळवून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, या टोळीच्या तपासादरम्यान रजनी पंडित हिचे नाव पुढे आले होते. त्याआधारे शुक्रवारी पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केली आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात राहणारी रजनी पंडित हिचे माहीम भागात कार्यालय आहे. घर आणि कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून तेथून लॅपटॉप, सीडी, डायरी आणि बेकायदेशीररीत्या विकत घेतलेले सीडीआर जप्त केले आहेत. तिने बेकायदेशीररीत्या पाच सीडीआर विकत घेतल्याची कबुली देत त्यापैकी तीन चुकीचे तर दोन बरोबर मिळाले असल्याचा दावा चौकशीदरम्यान केला आहे.

या दोनपैकी एका सीडीआरचा वापर लग्नापूर्वीच्या चौकशीसाठी, तर दुसऱ्या सीडीआरचा वापर मुलगा अमली पदार्थाचे सेवन करतो का, याची पाहाणी करण्यासाठी केल्याचे तिने चौकशीमध्ये सांगितले. मात्र, तिने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

विमा कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात

अटक करण्यात आलेल्या टोळीकडून चार नामांकित विमा कंपन्यांनीही बेकायदेशीररीत्या सीडीआर विकत घेतल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या कंपन्यांनी त्याचा वापर अपघातांच्या प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी किंवा अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्यात येणार असून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

 

दिल्लीतून सीडीआरचा पुरवठा..

या प्रकरणातील मुख्य आरोपी दिल्ली भागात राहत असून तोच अटक आरोपींना बेकायदेशीररीत्या सीडीआर मिळवून त्याचा पुरवठा करतो. या मुख्य आरोपीच्या शोधासाठी एक पथक दिल्लीला पाठविण्यात आले आहे. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचा तसेच मोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंग यांनी सांगितले.