कल्याण – कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात एका विकासकाने इमारत बांधकामासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू केले आहे. हे काम करताना लगतच्या पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणाच्या भूखंडावरील चार जुनाट झाडांच्या मुळाची माती जेसीबी चालकाने उकरून काढली. या झाडांना आधार न राहिल्याने ही चारही झाडे कोसळली आहेत.

इमारत बांधकामासाठी खोदकाम करताना पालिकेच्या लगतच्या उद्यान आरक्षणावरील झाडांना धोका निर्माण होईल, हे माहिती असूनही त्या झाडांच्या मुळाची माती उकरून काढून त्या झाडांना धोका निर्माण केल्याने पालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी विकासक गौतम दिवाडकर यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली आहे. पालिकेची परवानगी न घेता झाडे का तोडली, यासंबंधी खुलासा करण्याचे आदेश विकासकाला दिले आहेत. यापूर्वी खडकपाडा भागात एका विकासकाने अशाच प्रकारे इमारत बांधकामासाठी पोकलेनच्या साहाय्याने खोदकाम करताना लगतच्या इमारतीला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने काम केले होते. पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी मिळाली की कल्याण, डोंबिवलीतील विकासक लगतच्या इमारती, भूखंडाचा विचार न करता खोदकाम करतात, अशा विकासकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीसह ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांची कामे जून अखेर पूर्ण

विकासक गौतम दिवाडकर यांच्याकडून शिवाजी चौक भागात इमारत उभारणीसाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. हे काम करताना लगतच्या उद्यान आरक्षणावरील भूखंडावर असलेली चार जुनाट झाडांच्या मुळालगतची माती जेसीबी चालकाने खरवडून काढली. या झाडांना कोणताही आधार न राहिल्याने ती कोसळली. विकासकाने हेतुपुरस्सर ही झाडे कोसळण्याची प्रक्रिया केल्याने कल्याणमधील निसर्गप्रेमी नागरिकांनी यासंदर्भात पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली. उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी विकासकांना नोटीस पाठवून झाडांचे संरक्षण आणि जतन कायद्याने झाडे तोडताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. पूर्व परवानगी न घेता आपण झाडे तोडल्याने आपल्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, असा इशारा देणारी नोटीस विकासकाला दिली आहे.

हेही वाचा – “नालेसफाईची कामे व्यवस्थित केली नाही, तर…”, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरीकरणामुळे शहरातील झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत. त्या प्रमाणात झाडांचे संगोपन केले जात नाही. त्यामुळे शहरातील अस्तित्वातील जुनाट झाडे नियमबाह्य तोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे माजी नगसेवक सुधीर बासरे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी उद्यान अधीक्षक जाधव यांना संपर्क केला. ते मंत्रालयात बैठकीला गेल्याचे समजले. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. उद्यान विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, विकासकाचा झाडे तोडल्याप्रकरणी खुलासा प्राप्त झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ खुलाशा संदर्भात निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करतील.