डोंबिवली - मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांच्या कामासाठीचे सुटे भाग रेल्वे स्थानक भागात दाखल झाल्यामुळे ही कामे येत्या महिनाभरात पूर्ण होतील, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या सरकत्या जिन्यांच्या सुट्टे भागाचे सामान तिन्ही रेल्वे स्थानकांच्या बाजूला रस्ते मार्गाने आणून ठेवण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकावर तीन आणि चार स्थानकांच्या मध्यभागी सरकत्या जिन्यांसाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. स्थानकावरील या भागातून येजा करताना प्रवाशांना कसरत करावी लागते. अनेक महिने होऊनही रेल्वेकडून सरकत्या जिन्याचे काम पूर्ण करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. काम का रेंगाळले आहे, याची उत्तरे प्रशासनाकडून प्रवाशांना दिली जात नाहीत. हेही वाचा - मूल होत नसल्याने पत्नीची हत्या, अंबरनाथमधील घटना, आरोपी पतीला अटक अशाप्रकारचे काम कोपर रेल्वे स्थानक, ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मागील पाच ते सहा महिन्यांपासून रखडले आहे. ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण करावे म्हणून प्रवाशांनी रेल्वेकडे मागणी केली आहे. रेल्वे स्थानकात सरकते जिने नसल्याने ज्येष्ठ नागरिक, हदयरोगी, वृद्ध यांची जिने चढून स्थानकात जाताना दमछाक होते. काही प्रवाशांना विविध प्रकारच्या व्याधी असतात. अशा प्रवाशांना जिने चढले की त्रास होतो. असे प्रवासी सरकता जिन्याची कामे कधी पूर्ण होतात याकडे नजरा लावून बसले आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम लवकर पूर्ण करा म्हणून ठाकुर्ली भागातील एक प्रवासी मंदार अभ्यंकर नियमित रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन माध्यमातून तक्रारी करत आहेत. हेही वाचा - ठाणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून बेदम मारहाण सरकत्या जिन्याचे साहित्य मिळण्यात आणि त्याचा पुरवठा होण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ही कामे रेंगाळली. आता तिन्ही स्थानकातील सरकत्या जिन्यांसाठीचे सामान रेल्वे स्थानक भागात आणून ठेवण्यात आले आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील उद्वाहनाजवळ सरकत्या जिन्याचे साहित्य ट्रकने आणून ठेवण्यात आले आहे. हे साहित्य अवजड आहे. हे साहित्य मेगाब्लाॅक मिळाल्यानंतर फलाटावरून रेल्वे मार्गातून फलाट क्रमांक तीन व चारवर आणले जाईल, असे अधिकारी म्हणाला. आता साहित्य जोडण्याचे काम विद्युत विभागाकडून हाती घेतले जाईल. ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांची कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.