गुढी पाडव्यानिमीत्त ठाणे शहरातून निघणाऱ्या स्वागतयात्रांना अडथळा ठरत असलेल्या ढोलताशा पथकांना यंदा मुळ यात्रेपासून काहीसे लांब ठेवण्यात येणार आहे. ढोलताशा पथकांच्या सहभागामुळे स्वागतयात्रा जागोजागी कोंडीत अडकून पडत असल्याचे चित्र गेल्यावर्षी प्रकर्षांने दिसून आले. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतही मोठी भर पडते. या पाश्र्वभूमीवर ढोलताशा पथकांना शहरातील मुख्य चौकांमध्ये जागा ठरवून देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्या ठिकाणाहूनच ढोलताशा पथके चित्ररथांचे स्वागत करणार आहेत.
ठाण्याच्या स्वागतयात्रेत ढोलताशांना एक वेगळे महत्त्व आहे. शहराच्या प्रमुख भागांमधून निघणाऱ्या चित्ररथांना खेटून ढोलताशांची पथकेही या यात्रांमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे नृत्य, उत्साहाचा संगम या यात्रांमधून पाहावयास मिळतो. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून ढोलताशा पथकाच्या वाढत्या सहभागामुळे चित्ररथांसाठी तो अडथळ्याचा विषय ठरू लागला आहे. या पाश्र्वभूमी यावर्षी ठाण्यातील नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथकांना मूळ रथ यात्रेत सहभागी करण्यात येणार नाही, असे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत आठ ढोलताशा पथकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती श्री कौपिनेश्वर सांस्कृतीक न्यास नववर्ष स्वागत यात्रेचे निमंत्रक मयूरेश जोशी यांनी ठाणे लोकसत्ताला दिली.
ठाण्यातील स्वागतयात्रेचे यंदा १५वे वर्ष असल्याने यावर्षी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या दीपोत्सवाकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी काही विशेष कार्यक्रम करण्यात येणार आहेत. दीपोत्सव आणि स्वागतयात्रेची तयारी करताना पाडव्याच्या पूर्वसंध्येस तलावपाळी येथे जलपूजन करण्यात येणार आहे. गीतसंध्येचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच सेल्फी विथ स्वागत यात्रा, वेशभूषा स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा यांसारख्या स्पर्धा यावेळी घेण्यात येणार आहेत. त्याबरोबर महिलांची पारंपरिक वेशातील बाईक रॅलीही यावेळी काढण्यात येणार आहे. पाणी वाचवा, शेतकरी वाचवा, वृक्षसंवर्धन, सौरऊर्जेचा वापर, शाडूच्या मूर्त्यांचा वापर असे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्ररथ सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhol tasha pathak problem in thane
First published on: 05-04-2016 at 02:04 IST