ठाणे : आपण सर्व एकच आहोत हे ऑपरेशन सिंदुरच्या माध्यामातून दिसून आले. सर्व जाती, धर्म, पंथांतील नागरिक भारतीय लष्करा विषयीची कृतज्ञता व्यक्त करत असल्याची भावना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी करिअर कट्ट्यावर व्यक्त केली.

मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्यावतीने करिअर कट्टयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस प्रशासकीय अधिकारी होण्याचे राजमार्ग या विषयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले की, मोठी उंची एका झेपेत मिळत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. शांततेच्या काळात घाम गाळल्यास युद्धाच्या वेळेस रक्त सांडावे लागणार नाही, असे सांगत त्यांनी कष्ट, शिस्त आणि चिकाटीचे महत्त्व सांगितले. तसेच ज्ञान ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे.

चांगल्या सवयी म्हणजे ॲसेट्स तर वाईट सवयी म्हणजे लायाबिलीटीज आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी मुहूर्त बघू नका. जीवनाचे सकारात्मक ब्ल्यू प्रिंट तयार करा जे सकारात्मक, अर्थपूर्ण आणि रचनात्मक असले पाहिजे. त्याचबरोबर आजकालच्या मुलांचा स्क्रीन टाईम वाढत आहे, याबाबत पालकांनी दक्ष राहावे. स्वतःमधील बलस्थान, दुर्बलता, संधी आणि धोके ओळखून जीवनाचा मार्ग ठरवावा, असा मूलमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला. हेच तुमचे उत्कर्ष साधण्याचे वय आहे. अभ्यासाच्या पद्धती ठरवल्या असल्यातरी ध्यास मात्र असला पाहिजे. कोणतेही गोष्ट ही वाया जात नसते त्यामुळे मन लावू अभ्यास करा. त्याचप्रमाणे कधी छोटे, कधी मोठे, कधी मृदू, कधी कठोर व्हायला शिका. शिस्त आणि प्रयोगशीलता हेच यशाचे मार्ग आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा