कल्याण शहर परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना अभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गुंतवणूक योजनेतून सात लाख ५८ हजार रूपये जमा झाल्यानंतर गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या मायटोकन वॉलेट ट्रेडींग कंपनीच्या एका संचालकाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली आहे. गौतम शामप्रसाद पांडे असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील क्राऊन सिटी सोसायटीत राहणारे नोकरदार सम्राट नरेंद्र चौधरी (३८) आणि त्यांच्या सारख्या इतर नोकरदार, व्यावसायिक गुंतवणूकदारांनी मायटोकन वॉलेट ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक केली होती. मायटोकन कंपनीने टेलिग्राम वाहिन्या, युट्युब चित्रफिती, अनेक उपयोजनांमधून आपल्या गुंतवणूक योजनेची माहिती दिली होती. अभासी चलनात गुंतवणूक केल्यास १५ टक्क्यांपासून ते १५० टक्क्यांपर्यंत अल्पावधीत आकर्षक परतावा मिळतो, असे आश्वासन मायटोकनच्या जाहिरातींमध्ये करण्यात आला होता. जे गुंतवणूकदार इतर रहिवाशांना या योजनेत गुंतवणूक करण्यास उद्दुक्त करतील त्यांना स्वतंत्र आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन योजनेत होते. या जाहिरातीला भुलून कल्याणमधील खडकपाडा येथे राहणारे सम्राट चौधरी व इतर गुंतवणूकदार यांनी एकूण सात लाख ५८ हजार ५६० रूपयांची गुंतवणूक केली. पण मायटोकन कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विहित मुदतीत ग्राहकांना परतावा मिळाला नाही. अनेक ग्राहकांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी कंपनीकडे केली. त्याला कंपनीकडून प्रतिसाद देण्यात येत नव्हता. मायटोकन कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूक करण्यास सांगून आपली फसवणूक केली आहे. हे लक्षात येताच गुंतवणूकदार सम्राट चौधरी यांनी कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात तक्रार केली. तक्रार दाखल केली. त्यानंतर इतर तक्रारदारांनीही या गुंतवणूक योजनेत आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या.

खडकपाडा पोलिसांबरोबर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त सुनील लोखंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांच्या तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात जाऊन कंपनी संचालकाला अटक केली. या संचालकाच्या साथीदार संचालकांचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांनी किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मायटोकन कंपनीत ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह ठाणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शहर शाखेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक काटकर यांनी केले आहे.