पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतरही प्रवाशांचे दुखणे कायम
किशोर कोकणे
ठाणे : उपनगरीय रेल्वेगाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करूनही प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरणारे वेळापत्रक, वातानुकूलित लोकलच्या वाढविलेल्या फेऱ्या आणि मालगाडय़ांची उपनगरीय रेल्वे मार्गिकेवरून सुरू असलेली सततची वाहतूक यामुळे जल्लोषपूर्ण शुभारंभानंतरही पाचव्या-सहाव्या मार्गिकांमुळे प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली आहे. हे प्रश्न सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रवासी संघटनांकडून दिला जात आहे.
ठाणे आणि त्यापलीकडील लाखोंच्या संख्येने असलेले नोकरदार मुंबई, नवी मुबंईच्या दिशेने उपनगरीय रेल्वेतून प्रवास करत असतात. लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीमुळे उपनगरीय रेल्वे गाडय़ांचा खोळंबा होत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणास २००८ मध्ये मंजुरी दिली होती. मंजुरीनंतर १४ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढतील आणि वेळापत्रकही सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र पूर्वीचे चित्र बरे होते अशा प्रतिक्रिया आता रहिवाशांमधून उमटू लागल्या आहेत.
या मार्गिकेवर रेल्वे प्रशासनाने सामान्य लोकलऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. यातील अनेक वातानुकूलित रेल्वे या रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. तसेच प्रशासनाने वेळापत्रकातही बदल केला आहे. यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
हाल कायम
उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्या असल्या तरीही गेल्या काही दिवसांपासून मालगाडय़ांची वाहतूकही उपनगरीय रेल्वे मार्गिकेवरून सुरू असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेकडून केला जात आहे. पूर्वी मालगाडय़ा पारसिक बोगद्यातून धावत होत्या. या सर्व प्रकारांमुळे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यासंदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांना विचारले असता, प्रवाशांना सामान्य रेल्वेगाडय़ांची गरज सध्या अधिक होती, असे सांगितले. तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्या घेऊन रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वातानुकूलित गाडय़ा रिकाम्या धावत आहेत. पाचवी आणि सहावी मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण होऊनही त्याचा उपयोग झालेला नाही. नागरिकांचे हाल सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.
– सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक रेल्वे प्रवासी संघटना