राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथकासाठी तीन मजली इमारत
ठाणे जिल्ह्य़ातील धोकादायक इमारतींचा वाढता आकडा लक्षात घेऊन ठाणे शहरातील पोखरण रोड भागातील महापालिकेची तीन मजली इमारत राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथकाला देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने नुकताच घेतला. पाच वर्षांपासून या पथकाचा ‘ठाणे मुक्कामा’साठी सुरू असलेल्या जागेचा शोध अखेर संपला आहे. संपूर्ण जिल्ह्य़ासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे. या इमारतीमध्ये नियंत्रण कक्ष, निवासाची सोय तसेच अन्य सोयीसुविधा पुरविण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्यामुळे येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात हे पथक ठाण्यात दाखल होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शीळ-डायघर येथील लकी कम्पाऊंडमधील इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी ही घटना घडली होती. या घटनेदरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले होते. मुंबई तसेच आसपासच्या परिसरात या पथकाचे केंद्र नव्हते. पुणे जिल्ह्य़ातील तळेगाव भागात पथकाचे केंद्र होते. त्या ठिकाणाहून शीळ-डायघरमध्ये पोहोचण्यासाठी पथकाला चार ते पाच तासांचा अवधी लागला. असे असतानाही या पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी केली होती.
या घटनेचा अनुभव लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्य़ात राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथकाचे केंद्र उभारणीची घोषणा केली होती. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला जागेचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. लकी कम्पाऊंड दुर्घटनेनंतरही ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरांमध्ये इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर हा प्रस्ताव पुन्हा चर्चेला यायचा. प्रत्यक्षात मात्र पुढे काहीच होत नव्हते. अखेर ठाणे महापालिका प्रशासनाने या पथकाच्या केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोखरण रस्ता क्रमांक २ येथील उर्वी पार्कजवळील पालिकेची तीन मजली इमारत पथकाला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
या इमारतीमध्ये पथकाला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात हे पथक इमारतीत दाखल होईल आणि त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्य़ाला होईल, असेही त्यांनी सांगितले.
पडीक इमारतीचा कायापालट
पोखरण रस्त्यावरील ‘त्या’ तीन मजली इमारतीचे बांधकाम १३ वर्षे जुने आहे. या इमारतीमध्ये स्थानिक संस्था कर विभागाचे कार्यालय होते. मात्र, हा कर रद्द झाल्यापासून इमारतीचा वापर होत नव्हता. त्यामुळे इमारतीमधील पंखे, दरवाजे, मीटर बॉक्स असे साहित्य चोरीला गेले होते. या इमारतीची दुरुस्ती करून ती राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथकाला दिली जाणार आहे. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर पाच प्रमाणे एकूण २० सदनिका आहेत. एका सदनिकेमध्ये एक बैठी खोली, १ स्वयंपाकगृह आणि शौचालयाची व्यवस्था आहे. एका सदनिकेचे क्षेत्रफळ २७५ चौरस फूट असून त्यामध्ये तीन जवान राहू शकतील. त्यानुसार १६ इमारतीमध्ये ४८ जवान राहण्याची व्यवस्था होऊ शकते. या ठिकाणी पथकासाठी नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.