ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी नकोच या शिवसेनेच्या ताठर भूमिकेचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना एकला चालो रेच्या भूमिकेत असेल तर नवी मुंबई, उल्हासनगर आणि जिल्ह्यातील इतर निवडणुकांसाठीदेखील आघाडी करायची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून ठाण्यात या दोन पक्षांत सुरू असलेला हा अहंवाद जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये मात्र भाजपच्या पथ्यावर पडेल या विचाराने या दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकारी हवालदिल झाले आहेत. ठाण्यातील वाद मिटला नाही तरी आम्हाला आघाडी हवी आहे, असे आर्जव करत शिवसेनेच्या नवी मुंबईतील काही नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दार ठोठावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेची मोठी ताकद असून आतापर्यंत भाजपच्या नऊ नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधल्याने येथेही या पक्षाची ताकद पुर्वीपेक्षा वाढली आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जातात. शिंदेपुत्र खासदार श्रीकांत यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडत असलेल्या कल्याण डोंबिवली, कळवा, मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून हे करत असताना त्यांनी पालकमंत्र्यांच्या सर्वसहमतीच्या राजकारणालाही लाल बावटा दाखविल्याची चर्चा आहे. सत्तेच्या माध्यमातून डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील आणि कळवा-मुंब्रा भागात थेट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांना अंगावर घेण्याचे आक्रमक राजकारण खासदार शिंदे यांनी सुरू केल्याने गेल्या काही महिन्यांपासून या संपूर्ण पट्टय़ातील राजकारण कमालीचे तापले आहे. आव्हाड यांची ताकद असलेल्या कळवा-मुंब्रा पट्टय़ात मिशन शिवसेना मोहीम राबवून खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी निवडणुकीत आघाडी नाही अशी जाहीर भूमिका घेतली आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेत मुंब्रा भागात वाढ आणि दिव्यात प्रभागांची संख्या घटल्याने या दोन पक्षांतील वाद टोकाला पोहोचला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी या सर्व वादात पद्धतशीरपणे राजकीय मौन धारण केले असले तरी त्यांचे खासदार पुत्र आणि पक्षाचे इतर नेते मात्र मिळेल तिथे आव्हाडांना आव्हान देऊ लागले आहेत.
ठाण्याच्या वादात इतरांची दैना
ठाण्यातील शिंदे-आव्हाडांमधील या वादाची झळ आपल्याला बसू नये यासाठी जिल्ह्यातील इतर शहरांमधील आघाडीचे नेते मात्र सावध झाले आहेत. भाजपला टक्कर द्यायची असेल तर आघाडीशिवाय पर्याय नाही, असे आर्जव या दोन्ही पक्षांचे नेते वरिष्ठांकडे करू लागले आहेत.
आघाडी दोन्ही पक्षांच्या हिताची आहे. काही ठिकाणी आम्हाला तर काही शहरांमध्ये शिवसेनेला आघाडीचा फायदा होईल. उगाच अहंवाद बाळगून हातचे घालविण्यात अर्थ नाही. आमचा हात आघाडीसाठी सदैव पुढेच आहे.
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. कळव्यातही स्वर्गीय आनंद दिघे यांनी मेहनतीने घडविलेला शिवसैनिक भक्कमपणे तेथील नागरिकांसोबत आहे. त्यामुळे ठाण्यात आघाडी करू नये असे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
– नरेश म्हस्के, महापौर, शिवसेना