scorecardresearch

रस्ते निधीवरून डोंबिवलीत वाद

डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील ३० अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणातून करण्याचा ४६५ कोटींचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर झाला होता.

३० काँक्रीटीकरणाचे रस्ते एमएमआरडीएकडून रद्द, निधीवरुन  शिवसेना-भाजप जुगलबंदी

भगवान मंडलिक

डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील ३० अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणातून करण्याचा ४६५ कोटींचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर झाला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे रस्ते बांधण्यात येणार होते. हा प्रस्ताव राज्यात  महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्राधिकरणाने रद्द केला आहे. दरम्यान, ही कामे जरी रद्द झाली असली तरी संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या कामासाठी एकत्रित असा ३६० कोटी रुपयांचा निधी महानगर विकास प्राधिकरणाने खुला केला आहे, असा दावा शिवसेनेचे नेते करत असून या मुद्दय़ावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

फडणवीस सरकारमध्ये डोंबिवलीतील भाजपचे आमदार आणि वैद्यकीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण मंत्री होते. आमदार चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा क्षेत्रासाठी सुमारे ४६५ कोटी रुपयांचा निधी रस्तेकामांसाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर करून घेतला होता. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही रस्तेकामांचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेची गणिते बदलली. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले. यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने प्रस्तावित केलेली आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली डोंबिवलीतील रस्तेकामे याच कालावधीत एमएमआरडीएने रद्द केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मागविलेल्या माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.

जुने प्रस्ताव रद्दच

दरम्यान, डोंबिवलीत एमएमआरडीएकडून ३० रस्तेकामे हाती घेण्यात येणार होती. त्यामधील किती कामे पूर्ण झाली, असे प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएला केले होते. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अ. ब. धाबे यांनी प्राधिकरणाच्या अध्यक्ष यांच्यामार्फत डोंबिवलीतील रस्तेकामे रद्द करण्यात आली आहेत, असे उत्तर देण्यात आले आहे. ९० फुटी रस्त्यावर नवीन गृहसंकुलांसमोर प्राधिकरणाकडून रस्ते प्रस्तावित होते. या प्रश्नावर या प्रकरणाशी प्राधिकरणाचा संबंध नाही, असे उत्तर धाबे यांनी दिले आहे.

श्रेय कोण घेणार?

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ३१ रस्तेकामांसाठी सप्टेंबरमध्ये ३६० कोटी ६४ लाख रुपये मंजूर केले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या रस्तेकामांचा फेरआढावा घेताना संपूर्ण महापालिका हद्दीसाठी निधी खुला केल्याचे शिवसेनेमार्फत सांगितले जात आहे. ठरावीक भागापुरता निधी खुला करा, असा आग्रह धरण्यापेक्षा संपूर्ण महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर हाती घेतली जात आहेत, असा दावा शिवसेनेतील एका नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष योजनेतून मंजूर केलेली डोंबिवलीतील ३० रस्तेकामे एमएमआरडीएने कोणत्या नियमाने रद्द केली. त्यांना तो अधिकारी आहे का, ही समग्र माहिती घेऊन आपण प्राधिकरणाला जाब विचारणार आहोत.

 – रवींद्र चव्हाण, आमदार, भाजप डोंबिवली

डोंबिवलीत ३० काँक्रीटीकरणाचे रस्ते प्रस्तावित होते. एमएमआरडीए अध्यक्षांमार्फत ही कामे रद्द करण्यात आली आहेत.

– अ. ब. धाबे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute dombivali concreting roads mmrda ysh

ताज्या बातम्या