ठाणे : महिलांच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा अनेक बाजु असणारा विषय म्हणजे मासिक पाळी. या विषयावर प्रामुख्यान मौन पाळले जाते. मात्र, या विषयावर बोलले जावे या उद्देशाने ‘तिच्यावर बोलू काही…या मासिक पाळीवर मुक्त संवाद साधणाऱ्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मासिक पाळी संदर्भातील विविध विषयांवर स्पर्धेकांनी मुक्तपणे मत मांडले. तसेच या स्पर्धेत पुरूषांचा अधिक सहभाग असल्याचेही दिसून आले.

मासिक पाळी म्हटले तर मुलीच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच समाज देखील जोडलेला असतो. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. याबाबत मौन पाळणे पसंत केले जाते. मात्र, मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त (२८ मे) सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिच्यावर बोलू काही…’ या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये मासिक पाळी विषयी खुलेपणाने संवाद घडवणे, त्यांना मानसिक,शारीरिकरित्या सक्षम करणे.

पाळीसारख्या संवेदनशील विषयावर समाजात मोकळेपणाने संवाद व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ही वक्तृत्व स्पर्धा युवक, युवती, महिला आणि पुरुष अशा विविध वयोगटांतील स्पर्धकांसाठी होती. या स्पर्धेत सॅनिटरी पॅडची भेट, शरीरातील बदल आणि माझे मन, पहिली पाळी, मासिक पाळी आणि शाळा, कळी उमलताना, मासिक पाळी- लाजेची की सन्मानाची?, ‘ती’च्या नवीन भावना, स्त्रीशक्तीची सुरुवात -पाळी, उंच माझा झोका, तारुण्याच्या उंबरठ्यावर अशा विविध विषयांवर आपल्या वैयक्तिक अनुभवांचे, भावनिक गुंतवणुकीचे आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण स्पर्धकांनी केले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाड, कर्जत, पालघर आणि ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षी देखील अशाच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ये लाल रंग, कावळा शिवला, आळी मिळी गुप चिळी, मासिक पाळी आणि पर्यावरण, गर्भ ते गाभारा, ‘क’ कपड्याचा कि ‘क’ कपाचा, बाईपण भारी देवा असे विविध विषय स्पर्धकांनी उलगडले होते. तर, गारद फाऊंडेशन यांच्यावतीने ग्रामीण भाग, आदिवासी पाड्यात जाऊन तेथील स्त्रियांच्या जीवनातील मासिक पाळी हा विषय समजून घेण्यात आला होता.