दिव्याच्या सहायक आयुक्त अलका खैरे यांची उचलबांगडी; त्या ध्वनीफितचे प्रकऱण भोवल्याची चर्चा

दिवा भागातील बेकायदा बांधकामांच्या मुद्दयावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर महिनाभरापुर्वी टिका सुरु असतानाच, आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची आगाऊ खबर देऊन बांधकामे थांबविण्याचे आदेश देणारी एक ध्वनीफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली होती.

ध्वनीफितीचीही चौकशी सुरु
दिवा भागातील बेकायदा बांधकामांच्या मुद्दयावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर महिनाभरापुर्वी टिका सुरु असतानाच, आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची आगाऊ खबर देऊन बांधकामे थांबविण्याचे आदेश देणारी एक ध्वनीफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली होती. हे आदेश देणारी ती महिला अधिकारी कोण असे प्रश्न उपस्थित होत होते. त्याचदरम्यान रजेवर निघून गेलेल्या दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त अलका खैरे या गुरुवारी पुन्हा हजर झाल्या असून त्यांची दिवा प्रभाग समितीमधून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या ध्वनीफितची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरु असून हेच प्रकरण त्यांना भोवले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून भूमाफिया सक्रिय झाले असून त्यांच्याकडून शासकीय भुखंड, मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून इमारती उभारणीची कामे सुरु आहेत. या संदर्भात भाजपने नुकतीच प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. दिवा भागातही मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे सुरु असल्याची ओरड महिनाभरापुर्वी होत होती. काही हितसंबंधी व्यक्तींची बांधकामे वाचविण्यासाठी भुमाफियांना कारवाईची आगाऊ खबर दिली जाते. तर किरकोळ बांधकामांवर कारवाईचा देखावा निर्माण केला जातो. असा आरोपही होत होता. असे असतानाच या आरोपांना दुजोरा देणारी एक ध्वनीफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यामध्ये ‘ नाना उद्या सकाळीच कमिशनर साहेब दिव्यात आहेत. सगळी कामे कटाक्षाने बंद ठेवा’, अशा सुचना एका महिला अधिकाऱ्याकडून देण्यात येत होती. त्यामुळे ही महिला अधिकारी कोण असे प्रश्न उपस्थित होत होते. सहायक आयुक्त अलका खैरे यांच्याकडे दिवा प्रभाग समितीचा पदभार होता. ती ध्वनीफित प्रस्तारित झाल्यानंतर काही दिवसांतच खैरे या रजेवर निघून गेल्या. त्यामुळे मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांच्याकडे दिवा प्रभाग समितीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, अलका खैरे या गुरुवारी पुन्हा हजर झाल्या असून त्यांची दिवा प्रभाग समितीमधून उचलबांगडी करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ही कारवाई केली आहे. खैरे यांच्याकडे जाहीरात, निवडणुक आणि जनगणना विभागाचा पदभार होता. हा पदभार मात्र कायम ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची आगाऊ खबर देऊन अनधिकृत बांधकामे बंद करण्याचा आदेश देणारी ती महिला अधिकारी कोण आहे? असा प्रश्न भाजपाचे आमदार संजय केळकर आणि ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला होता. तसेच या ध्वनीफितीचा पेन ड्राईव्ह आयुक्तांकडे सुपूर्द करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diva assistant commissioner alka khaire talk rubbing salt wounds soundtrack inquiry amy

Next Story
महावितरणची वीज देयक केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी