उल्हासनगरः गणरायाचे स्वागत भक्तिभावाने मात्र शांततेत व्हावे आणि हे होत असताना कोणताही नियमभंग होऊ नये यासाठी गणेश मंडळांची विशेष बैठक उल्हासनगरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनिप्रदूषणाचे परिणाम, त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि सरकारच्या मार्गदर्शक सूचना अशा गोष्टीची माहिती देण्यात आली. शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेशोत्सवासाठी मंडळांनी यावेळी सहमती दर्शवली. यावेळी अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवांच्या पूर्वीच उल्हासनगर शहरात गणेशोत्सव मंडळांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. गणेश मंडळांनी कोणतीही परवानगी न घेता ढोल, ताशा वाजवत रस्ते अडवत मिरवणूक काढली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरात अन्य भागातही अनेक गणेश मंडळे रस्ते अडवून तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता आणि वाहतूक व्यवस्थापन न करता मिरवणूक काढत असल्याचे समोर आले होते. त्याच पार्श्वभूमी नुकतीच सर्व गणेश मंडळांची उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील शहीद जनरल अरूणकुमार वैद्य सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

गणेशोत्सव शांततेत, कायदेशीर मर्यादेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी ही समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका, पोलिस, शासकीय यंत्रणांची उपस्थिती होती. या वेळी प्रशासन आणि पोलिसांनी उत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्धार केला. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी लघुपट आणि पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम मंडळांना सांगितले. अतिरेकी आवाजामुळे उद्भणारे आजार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणारे वाईट परिणाम यावेळी सांगण्यात आले. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य सरकारची नियमावली आणि मार्गदर्शन सूचना तसेच पोलिस महासंचालकांच्या परिपत्रकांची माहिती देण्यात आली. तर डीजे – डॉल्बीमुक्त उत्सवाचे महत्त्व गणेश मंडळांना पटवून सांगण्यात आले. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेसंदर्भातील अडचणींवर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीजवितरण कंपनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांची सोय, स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जाईल, प्रशासन सर्व विभागांशी समन्वय साधून ‘डॉल्बी डीजेमुक्त उत्सव’ यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे.- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

गणेशोत्सवात कायद्याचे पालन, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि नागरिकांची सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी आहे. सर्व मंडळांनी प्रशासनाशी समन्वय साधून ‘डॉल्बी-डीजेमुक्त उत्सव’ साजरा करण्यासाठी सहकार्य करावे. – सचिन गोरे, पोलिस उपायुक्त