कडोंमपा आयुक्तांची महावितरणला सूचना

कल्याण : बेकायदा बांधकामांचे आगार ठरलेल्या कल्याण-डोंबिवली शहरात नव्याने उभ्या राहाणाऱ्या बेकायदा बांधकामे तसेच इमारतींना वीजपुरवठा करू नका, अशी सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणला केली आहे. नवीन इमारतीची कागदपत्रे, बांधकाम परवानग्यांची सत्यता पडताळून मगच अशा बांधकामांना महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात यावा, अशी सूचना सूर्यवंशी यांनी महावितरणचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांना केली आहे.

महापालिका हद्दीत अनेक भागात गृहसंकुलांची कामे मोठय़ा संख्येने प्रगतिपथावर आहेत. या इमारतींना पालिकेच्या नगररचना विभागातर्फे बांधकाम परवानग्या दिल्या जातात. त्यानंतर विकासक प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करतो. अनेक विकासक, बांधकामधारक पालिकेच्या परवानग्या न घेताच तसेच बनावट कागदपत्रे तयार करून अनधिकृत इमारती उभारण्याची कामे करत आहेत. अशा इमारतींमध्ये रहिवाशांनी घरे घेतली. त्या बांधकामांवर पालिकेने कारवाई केली तर यामध्ये सर्वाधिक नुकसान घर घेणाऱ्या सामान्य रहिवाशांचे होते. अनेक बांधकामे पालिकेचे भूखंड, सरकारी जमिनीवर करण्यात आली आहेत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. महावितरणने अनधिकृत इमारतींना वीजपुरवठा दिला नाही तर अशा बेकायदा इमारतींमध्ये कोणीही रहिवासी घर घेण्यासाठी पुढे येणार नाही. पालिका हद्दीतील प्रत्येक नवीन इमारतीला नव्याने विद्युतपुरवठा करताना त्या इमारत उभारणीला नगररचना विभागाने परवानगी दिली आहे का, याची पडताळणी महावितरण अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. तशा सूचना महावितरणच्या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना द्याव्यात, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी मुख्य अभियंता अग्रवाल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कायद्यातील तिढा

‘बांधकामाला वीजपुरवठा करताना विकासक जी कागदपत्रे महावितरणकडे दाखल करतो, त्या आधारे वीजपुरवठा संबंधित इमारतीला दिला जातो. कागदपत्रे खरी की खोटी, ती इमारत अनधिकृत, अधिकृत ठरविण्याचा अधिकार महावितरणला नाही. त्यामुळे वीजपुरवठय़ाचा प्रस्ताव आला की त्या आधारे विकासकाच्या मागणीप्रमाणे इमारतींना वीजपुरवठा केला जातो’, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आयुक्तांच्या पत्रावर महावितरणची भूमिका काय असेल यासाठी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांना दोन दिवस सतत संपर्क केले. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. महावितरणचे कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंता काकडे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी पत्र मुख्य अभियंत्यांना लिहिले असल्याने नक्की ते पत्र काय आहे ते पाहावे लागेल. यासाठी आपण महावितरणच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधा. पत्राचा आशय पाहून याविषयी अधिक बोलता येईल, असे सांगितले.